'पवार फुटीरतावाद्यांसोबत, तिकडे शोभत नाहीत'
   दिनांक :09-Apr-2019
लातूर,
आज फुटीरतावादी लोकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उभे आहेत. शरदराव तुम्ही अशा लोकांसोबत उभे आहात, हे तुम्हाला शोभतं का? असा सवाल करतानाच राजकारण वेगळी गोष्ट आहे, मात्र पवार तिकडं शोभत नाहीत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
 
 
लातूरच्या औसा येथील महायुतीच्या जाहीरसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही टीका केली. मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. त्यांनी या भाषणात काँग्रेससह शरद पवार यांच्यावरही खरपूस टीका केली. ज्यांना काश्मीरमध्ये वेगळा पंतप्रधान हवाय, त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत. काँग्रेसकडून कोणतीही अपेक्षा केली जात नाही. पण शरदराव तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, अशा शब्दांत मोदींनी पवारांवर टीकास्त्र सोडले. राष्ट्रीय सुरक्षेसाठी आम्ही संकल्प केला आहे. जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटविण्यात येणार नाही, असं काँग्रेस म्हणतेय. काँग्रेसचं ढकोसलापत्र (जाहीरनामा) आणि पाकिस्तानची भाषा एकच आहे. काँग्रेसलाही फुटीरतावाद्यांशी चर्चा करायची आहे आणि पाकिस्तानलाही तेच हवं आहे, अशी घणाघाती टीका मोदी यांनी केली.
देशद्रोहाचं कलम हटवून काँग्रेस मानवतावादाच्या गप्पा मारत आहे. पण याच काँग्रेसने बाळासाहेब ठाकरे यांचा मताचा अधिकार काढून घेतला होता. त्यामुळे काँग्रेसने आधी स्वत:ला आरश्यात पहावं आणि मगच मानवतावादाच्या गप्पा माराव्यात असा टोलाही मोदींनी हाणला.
अतिरेक्यांना त्यांच्या घरात घुसून मारणं हीच आता नव्या भारताची नीती आहे. दहशतवादाचा नायनाट करणं हा आमचा संकल्प आहे. जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रवाद्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्यात आला आहे. तिथे परिस्थिती सामान्य होताना दिसत आहे. घुसखोरांची ओळख पटविण्यातही आम्ही यशस्वी झालो असून यापुढे आम्ही घुसखोरीला लगाम घालू, असं त्यांनी स्पष्ट केलं.
चौकीदार चोर आहे, असं ते गेल्या सहा महिन्यांपासून बोलत आहेत. मात्र नोटांचे बंडल त्यांच्या दरबारातील लोकांच्या घरातच निघालेत. त्यामुळे काँग्रेसच चोर असून त्यामुळेच त्यांना चौकीदाराची भीती आहे, असं हल्लाही त्यांनी चढवला.