खर्‍या कार्यकर्त्याचे घडले दर्शन!
   दिनांक :09-Apr-2019
 
 
 
भाजपा-शिवसेना आणि मित्रपक्षांच्या युतीने दिलेला जळगाव लोकसभा मतदार संघातील उमेदवार बदलणार या गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या आणि सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल झालेल्या चर्चेला गुरुवारी सकाळी चाळीसगावचे आ. उन्मेष पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पूर्णविराम मिळाला. या निमित्ताने नेते, कार्यकर्ते आणि कार्यकर्ते-नेते या वृत्ती-प्रवृत्तीतील फरकही ठसठशीतपणे दिसून आला.
 

 
 
महायुतीने निर्णय घेऊन प्रारंभी आ. स्मिताताई वाघ यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यानुसार त्या कामालाही लागलेल्या होत्या. दरम्यान, आपण दोन टर्म काम करूनही तिसर्‍या वेळी काहीही कल्पना न देता आपल्याऐवजी आ. स्मिताताई वाघ यांना भाजपाने उमेदवारी दिल्याने विद्यमान खा. ए. टी. नाना पाटील संतप्त झाले होते. त्यांनी हा राग कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्तही केला होता, आणि उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरीचाही इशारा दिला होता. दरम्यान, अमळनेरचे भाजपाचेच सहयोगी आ. शिरीष चौधरी यांचाही उमेदवारीत इंटरेस्ट निर्माण झाल्याने त्यांनीही तसे बोलून दाखविले होते. यातून मत विभाजन होऊन महायुतीच्या उमेदवाराला येथे दगाफटका होण्याची शक्यता लक्षात येताच सर्व नेत्यांनी सर्वमान्य उमेदवाराचा शोध सुरू केला. तो चाळीसगावचे आ. उन्मेष पाटील यांच्या नावाजवळ येवून थांबला. त्यासंदर्भात बुधवारी रात्री उशिरापर्यंत युतीच्या नेत्यांचे बैठक आणि चर्चांचे सत्र सुरू होते. मध्यरात्रीनंतर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले अन्‌ सर्वजण घरी परतले. चाळीसगावकरांनी रात्रीच फटाके फोडत आणि जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा केला.
उमेदवारी घोषित झाल्यापासून आ. स्मिताताई वाघ यांनी अत्यंत नियोजनबद्धपणे सुरू केलल्या प्रचाराला सर्वत्र उत्तम प्रतिसाद लाभत होता. बुधवारी उमेदवार बदलाचे वारे जोरात वाहायला लागल्यावरही त्यांचा प्रचार सुरूच होता. प्रत्यक्षात गुरुवारी दुपारी 2 वाजता आ. उन्मेष पाटील यांनी भाजपातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हासुद्धा आ. स्मिताताई वाघ उपस्थित होत्या. खरेतर अधिकृत उमेदवारी जाहीर होणे, उमेदवाराने नियोजनपूर्वक प्रचार सुरू करणे, त्याला उत्तम प्रतिसाद लाभणे आणि एका क्षणी वरिष्ठांकडून ती उमेदवारी मागे घेण्याची सूचना येणे-यामुळे एखाद्या व्यक्तीला जे वाटू शकते तेच स्मिताताईंना वाटले. तीच भावना त्यांनी बोलून दाखविली. परंतु, त्यांच्या स्वरात कुठेही बंडखोरीचा, कटुतेचा, डावलले गेल्याचा, अवमान झाल्याचा वा हाता-तोंडाशी आलेला यशाचा घास हिरावला गेल्याचा भाव नव्हता. त्यांच्या डोळ्यातून वाहणार्‍या अश्रूंनीच त्यांच्या भावना अधिक बोलक्या केल्या. एखाद्या सुसंस्कारित कार्यकर्त्याकडून अशावेळी ज्या शालिनतेच्या वर्तनाची अपेक्षा असते, तसेच शालीन व विनम्र असे त्यांचे वर्तन होते. या पार्श्वभूमीवर खा. ए. टी. पाटील आणि आ. शिरीष चौधरी यांच्या व्यक्तिमत्त्वातील फरक लक्षात येतो. उमेदवारी नाकारताच ए. टी. नानांनी बंडखोरीची भाषा केली होती. खरे तर त्यांच्याकडून मोठ्या मनाने हा निर्णय स्विकारण्याची अपेक्षा होती. आ. उन्मेष पाटील उमेदवारी अर्ज सादर करतांना खा. ए. टी. नाना पाटील अनुपस्थित होते. त्यांनी खिलाडू वृत्ती दाखवत उपस्थिती दिली असती तर त्याचे कौतुकच झाले असते. कारण ही निवडणूक शेवटची नाही. कुठलाही पक्ष वर्तमान स्थितीत एखाद्यावेळी जो निर्णय घेतो तो कायमस्वरूपी कधीच नसतो. भाजपानेही असाच निर्णय घेतला असावा.
या पार्श्वभूमीवर आधी उमेदवारी जाहीर झालेल्या परंतु पक्षनिर्णयानुसार माघार घ्यावी लागलेल्या आ. स्मिताताई वाघ यांची उपस्थिती लक्षणीय आणि चर्चित ठरली.
कुठलाही पक्ष मोठा होतो तो अशा संस्कारशील खंद्या कार्यकर्त्यांमुळेच. ज्याचे दर्शन आ. स्मिताताई वाघ यांनी घडवले. भविष्यातही सर्व कार्यकर्त्यांकडून अशाच दिलदार आणि खिलाडूवृत्तीची अपेक्षा आहे. कारण त्याशिवाय पक्ष मोठा होणे शक्य नसते.
आता तर कुठे निवडणुकीला प्रारंभ झाला आहे. अजून घोडामैदान बरेच दूर आहे. तापत्या उन्हासोबतच निवडणुकीचे वातावरणही तापत जाणार आहे. त्यामुळे भविष्यात आणखी काय-काय पाहायला मिळते आणि निवडणुकीचे बदलते रंग अखेर कोणते रूप धारण करते, ते काळच जाणे!