भारतीय अणुशास्त्रज्ञांच्या मृत्यूचे गूढ!
   दिनांक :09-Apr-2019
तिसरा डोळा  
 
 चारुदत्त कहू 
 
 
अणुभौतिकशास्त्र (न्यूक्लिअर फिजिक्स) हा विज्ञानातील अतिशय किचकट आणि तेवढाच आव्हानात्मक विषय. एकेकाळी या क्षेत्रात अतिशय पिछाडीवर असलेला आपला देश आज या क्षेत्रात प्रगतीचे, नवनिर्मितीचे झेंडे फडकवताना दिसत आहे. या विषयाचा थेट संबंध राष्ट्राच्या लष्करी ताकदीशी आणि राष्ट्रीय सुरक्षेशी जोडला जातो. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंध असल्याने गोपनीयता पाळली जाणे हा येथे ‘थंब रूल’ आहे. पण, आश्चर्याची बाब म्हणजे, गेल्या काही वर्षांत अतिशय महत्त्वाच्या हुद्याच्या जागेवर काम करणार्‍या शास्त्रज्ञांच्या झालेल्या मृत्यूंचे गूढ आजवर उकलले गेलेले नाही वा ते उकलले जावे, यासाठी साधे प्रयत्नदेखील झालेले नाहीत.
होमी जहांगीर भाभा, लोकनाथन महािंलगम, उमा राव, रवी मुळे, एम. अय्यर, के. के. जोशी, अभिष शिवम्‌, उमंग िंसग, पार्थ प्रतिम बाग, टायट्‌स पाल, दलिया नायेक आदी शास्त्रज्ञांचे मृत्यू संशयास्पद स्थितीत झाले आणि त्याचे गूढ अद्याप उलगडले गेले नाही. या मृत्यूंमागे अथवा हत्यांमागे कुठल्या देशी शक्ती आहेत की आंतरराष्ट्रीय कटकारस्थानाला हे शास्त्रज्ञ बळी पडले, हे आजवर निष्पन्न झाले नसले, तरी आता मात्र त्यामागचे रहस्योद्घाटन व्हायला हवे.
अणुशास्त्रज्ञांच्या गूढ मृत्यूंची ही मालिका सुरू झाली ती 1966 सालापासून आणि त्यात पहिला बळी गेला तो भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा यांचा. भारताच्या अणुऊर्जा विकास कार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे प्रणेते मानले जाते. येत्या काळात भारत अणुबॉम्ब तयार करू शकेल, असे वक्तव्य होमी भाभांनी त्या वेळी केले काय आणि त्यांचा एका विमान अपघातात मृत्यू झाला काय... संयुक्त राष्ट्राच्या सभेला जात असताना 24 जानेवारी, 1966 या दिवशी फ्रान्सच्या हद्दीत असताना त्यांचे विमान अपघातात निधन झाले. हा अपघात माऊंट ब्लांकजवळील स्वीस आल्पस्‌ येथे झाला आणि या अपघातानंतर विमानाचे कुठलेही अवशेष सापडले नाहीत. होमी भाभांचा झालेला हा अपघाती मृत्यू एखाद्या आंतरराष्ट्रीय कारस्थानाचा भाग असू शकतो, याची अनेक कारणे आहेत. पण, त्याबाबत फारसे लिहिले आणि बोललेही गेले नाही. भारताच्या अणू कार्यक्रमात अडथळे आणण्यासाठी सीआयएने होमी भाभांच्या अपघाती मृत्यूचे कटकारस्थान रचले, अशी त्या वेळी चर्चा होती. पण, याबाबतचा तपास चर्चेच्या पलीकडे मात्र गेला नाही. एक मात्र निश्चित की, त्यांच्या मृत्यूमुळे भारत एका महान अणुशास्त्रज्ञाला मुकल्याची भावना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह सार्‍याच महनीयांनी व्यक्त केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर ट्रॉम्बे येथील अणू संशोधन केंद्राचे नाव बदलून भाभा अणू संशोधन केंद्र, असे ठेवण्यात आले.
 
 
 
डॉ. होमी भाभा यांच्या मृत्यूनंतर 2009 ते 2013 या काळात अणुऊर्जा विभागातील 10 शास्त्रज्ञांचे गूढ मृत्यू झाले. 13 जून 2009 रोजी कर्नाटकातील कैगा अणुऊर्जा केंद्रात कार्यरत असलेले, पण प्रसिद्धीच्या झोतात नसलेले अणुशास्त्रज्ञ लोकनाथन महािंलगम यांच्या मृत्यूची वार्ता दूरचित्रवाणीच्या वृत्तवाहिन्यांवरून देशवासीयांच्या कानोकानी झाली. ‘प्रोजेक्ट सीबर्ड’ या भारतीय लष्करी तळाशेजारी उभारल्या गेलेल्या अणू संशोधन केंद्रात ते आठ वर्षांपासून संशोधनकार्यात मग्न होते. कैगामध्ये आठ न्यूक्लिअर रिअॅक्टर असून, भारताच्या हिताचे रक्षण करण्यासाठी त्यातील चार आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या (आयएइए) अधिकार कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहेत.
 
8 जून 2009 रोजी कैगा अणुऊर्जा केंद्रातील 47 वर्षीय ज्येष्ठ शास्त्रज्ञ एल. महािंलगम सकाळी फिरायला गेले आणि परतलेच नाहीत. पाच दिवसांनंतर त्यांचे कुजलेले प्रेत काली नदीत सापडले. पोलिसांनी एल. महािंलगम यांनी आत्महत्या केल्याचा अहवाल दिला. तथापि, त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या तपासावर आणि त्यांच्या अहवालावर अविश्वास व्यक्त केला. सकाळी फिरायला गेले तेव्हा त्यांच्याजवळ ना पैशाचे पाकीट होते ना त्यांनी त्यांचा सेलफोन सोबत नेला होता. सुरक्षारक्षकांच्या मते, ते कधीही कॅम्पसच्या बाहेर फिरायला जात नसत. त्यांच्याबाबत अशीच घटना 10 वर्षांपूर्वीही घडली होती. त्या वेळी ते पलक्कड येथील केंद्रात कार्यरत होते. असेच एके दिवशी ते परिसरातून गायब झाले आणि कुणालाच दिसले नाहीत. पाच दिवसांनी अचानक ते परतले तेव्हा केंद्रातील सार्‍यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्यांच्या गूढ मृत्यूकडे प्रसारमाध्यमांनीही फारसे लक्ष दिले नाही. महािंलगम यांचा मृतदेह जेथे आढळला, त्या ठिकाणी पाच वर्षांपूर्वी एका सशस्त्र गटाने, अणुऊर्जा केंद्रातील एका अधिकार्‍याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. पण, हा अधिकारी कसाबसा त्यांच्या तावडीतून सुटून आला. महािंलगम यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीचे गठन करण्यात आले होते. या समितीच्या हाती काहीच लागले नाही. पोलिसांना अखेरपर्यंत, त्यांचा मृत्यू नदीत पडल्याने झाला की ती एक आत्महत्या होती, हे शोधून काढता आले नाही.
भाभा अणुऊर्जा केंद्रातून निवृत्त झालेल्या 63 वर्षीय उमा राव यांनी त्यांच्या गोवांडी येथील निवासस्थानी निराशेच्या गर्तेतून आत्महत्या केली. अत्यंत टोकाच्या या कृत्याबद्दल कुणालाही दोषी ठरवू नये, असे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले होते. उमा राव यांच्या नातेवाईकांनी मात्र ही आत्महत्या नसून यामागे काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यांच्या शरीरावर आत्महत्या केल्याच्या कुठल्या खुणाही आढळल्या नव्हत्या. त्यांच्या एका सहकार्‍याने त्यांच्यात कधीच निराशा बघितली नसल्याचे नमूद केले होते. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे आणखी एक कर्मचारी रवी मुळे हे असेच रहस्यमय पद्धतीने बेपत्ता झाले. त्यानंतर त्यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांना तपासात कुठलाच सुगावा हाती न आल्याने, त्यांच्या भावाने बरेच दिवस या प्रकरणाचा पाठपुरावा केला, पण त्याच्या हाती निराशेशिवाय काहीच आले नाही.
 
23 फेब्रुवारी 2010 रोजी भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटरमधील इंजिनीअर एम. अय्यर यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानी आढळून आला. यामागचे गूढ शोधून काढण्यात पोलिसांना अखेरपर्यंत यश आले नाही. भारताच्या महत्त्वाकांक्षी अणुऊर्जा कार्यक्रमाशी जुळलेले इतर शास्त्रज्ञ आणि इंजिनीअर्सच्या मृत्यूनंतर ज्याप्रमाणे न्यायसाहाय्य प्रयोग शाळेच्या हाती, गुन्हा केलेल्या व्यक्तीच्या संदर्भात कुठलेच पुरावे लागले नाहीत, त्याचप्रमाणे एम. अय्यर यांच्याबाबतीतही झाले. आत्महत्येचे कारण कळले नाही की, त्याबाबत पोलिस मृत्यूचे कारण ‘अस्पष्ट’ असा शेरा देऊन प्रकरण हातावेगळे करतात. पण, अय्यर यांच्याबाबतीत त्यांच्या डोक्याच्या आतील बाजूस मोठा रक्तस्राव झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. वरील सार्‍या प्रकरणांत ना कुणाला अटक झाली, ना कुणावर संशय व्यक्त झाला. या सार्‍या प्रकरणांमध्ये गुन्हेगाराने कुठेही आपल्या बोटांचे ठसे मागे न सोडल्याने न्यायसाहाय्य विभागही हतबल होता. याचाच अर्थ, या हत्यांमागे अतिशय व्यावसायिक पद्धतीने कार्य करणारी डोकी गुंतली होती, हे स्पष्ट होते. ऑक्टोबर 2013 मध्ये आयएनएस अरिहंत या अण्वस्त्रवाहू पाणबुडीवर कार्यरत के. के. जोशी आणि अभिष शिवम्‌ या अभियंत्यांचे मृतदेह विशाखापट्‌टनम्‌ येथील रेल्वे रुळावर आढळून आले होते. त्यांची कुठेतरी हत्या करून, त्यांचे मृतदेह रेल्वे रुळावर आणून टाकल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला होता. उमंग िंसग आणि पार्थ प्रतिम बाग या युवा संशोधकांचा 30 डिसेंबर 2009 रोजी बार्कच्या मॉड्युलर प्रयोगशाळेला लागलेल्या रहस्यमय आगीत मृत्यू झाला होता. ही आग कशी लागली, याचे कारण आजवर समजलेले नाही. 2012 मध्ये इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटॉमिक रिसर्च, कलपक्कम येथील मोहम्मद मुस्तफा या 24 वर्षीय शास्त्रज्ञाचा मृतदेह त्याच्या क्वार्टरमध्ये आढळला होता. मुस्तफाची सुसाईड नोट आढळली, पण आत्महत्या कशी झाली, हे कळू शकले नाही. भारतीय अणुशास्त्रज्ञांच्या रहस्यमय मृत्यूंची ही यादी आणखी वाढवता येईल, पण त्यातून साध्य काहीच होणार नाही. अणुशास्त्रज्ञांच्या मृत्यूचे गूढ उकलले जावे आणि त्यांच्या आप्तस्वकीयांना न्याय मिळावा, यासाठीच हा लेखनप्रपंच!
 
9922946774