थंडी, बर्फ आणि तंबूतली रात्र
   दिनांक :09-Apr-2019
 
 अमान रेड्डी 
 
सकाळी भल्या पहाटे उठून तयार होत चांगलीच हाणली गाडी. उपशीला एका वहीत नोंद करावी लागते म्हणून थांबलो. तिथला सैनिक सांगत होता, वर बर्फ असणार, कारण इथे पाऊस पडतोय. आज मी गमबूट घातले होते. पावसाळी सूटपण होता. तरी धाकधूक होतीच. पूढे चिंचोळ्या खिडकीतून वाटचाल होती. इथे सगळीकडेच आपण सतत खिंडीतून जात एखादा घाट चढत असतो व त्या खिंडीत नदी असतेच असते. ही खिंड मात्र जरा जास्तच चिंचोळी होती त्यामूळे त्याच गूढ वाढलं होतं. वाटेत एका ठिकाणी फोटोसाठी म्हणून थांबलो. तर मागून आमचे इतर बायकर्स आले. आता खिंड थोडी मोकळी झाली होती आणि त्यामुळे तो बर्‍याचदा एकदम दूरवर एक ठिपका म्हणून दिसत असे. मी मात्र अतुलच्या मागे मागेच चालवत रहिलो. बराच वेळ खिंडीत  नदीच्या पातळीवरच चालवत होतो. मग घाटाचा चढ सुरू झाला आणि कुठेतरी अक्षय थांबला होता आमच्यासाठी, तो भेटला. हा टांगलांगला तर फारच नयनरम्य होता. बर्फच बर्फ सगळीकडे आणि हिरवेगारपण. श्रीनगर ते लेह, लेह ते पंगोंग किंवा नुब्रा, हे रस्ते आणि डोंगर वैराण होते. आता लेह ते मनाली मधील पर्वत हिरवेगार दिसू लागले आणि बर्‍याचदा रस्त्याच्या दुतर्फा बर्फच बर्फ. पाऊसही थांबला होता. शिवाय आता घाट चढायची उतरायची एवढी सवय झाली होती.
 
अगदी आरामात शिखरावर पोहोचलो. फोटो काढले. उतरायला सुरवात. 20-25 किलोमीटर नंतर रस्ता सपाट होऊ लागला होता, खिंड मोठी होऊ लागली होती. एकदम खडी, दगड आणि पांढरी धूळ यांचा रस्ता सुरू झाला. या रस्त्यावरून जायला थोडा बिचकलोच, कारण पंक्चरची भीती. मागून आमचे एफ 1 रेसर्स आणि निलेश दणादण आले आणि वेगात पुढे गेले. म्हटलं चला असंच जावं लागणार आहे. मग आम्हीही सुटलो जोरात. 4-5 किलोमीटर गेल्यावर डेिंब्रगला एक टपरी लागली. तिथे जेवायला थांबलो. 4-5 मिनिटात गरम गरम पराठे आले समोर. झकास जेवण झालं. बाजूलाच एक गोड म्हातारी विणत बसली होती. तिचा फोटो काढला. आता थोड अंतर अजून खराब रस्त्यावरून गेल्यावर एकदम गुळगुळीत रस्ता लागला आणि दुतर्फा पूर्ण सपाट जमीन. सगळे एकदम सुसाट सुटले 80-90 च्या वेगात. फारच धमाल आली. हे होते मूरे मैदान. अर्धा -पाऊण तास या मैदानातून गेल्यावर एका मस्त खोल दरीपाशी येऊन पोहोचलो. एक नदी वहात होती.
 
 
 
 
 
पांग गाव जवळ येत चालल होतं. वाटेत आमचे काही बाईकर्स थांबलेले दिसले. मला वाटल असेच फोटोसाठी थांबलेत. त्यांनीही पुढे जात रहा अशी खूण केली आणि मी गेलो पुढे. 2-3 किलोमीटर उतरल्यावर पांग गावी पोचलो. तिथे थांबून वाट पहात बसलो हे दोघे आत्ता येतील मग येतील... 10 मिनिटे थांबूनही हे दोघे न आल्याने मी पुढे निघालो. परत एकदा चिंचोळ्या  खिलकीतून जायचे होते. 10-15 मिनिटांनी एक पूल ओलांडला आणि रस्त्याच्या कडेला गाडी लाऊन मी कडेला दगडांवर आडवा झालो. मला जाम झोप आली होती आणि तसंही परत एकदा यांची वाट पहावी, असा विचार केला. 10-20 मिनिटेच झाली तेवढ्या वेळात मला 4-5 तरी ट्रक, कार, बायकर्सनी थांबून विचारले की, कारे बाबा का झोपलास, काही मदत हवी आहे का? म्हटले नाही असाच झोपलोय... मदतीला तयार असणारी माणसं असतात इथे. अजूनही कोणीच आले नव्हते आमच्या मंडळींपैकी. एकाची गाडी पंक्चर झाली होती त्यामुळे ते अडले होते.
 
मी मात्र या घडामोडींपासून अनभिज्ञ होतो. थोडा थोडा पाऊस पडत होता. मी मजल दरमजल करत वर पोहोचलो तेव्हा कळले की मी लाचूंगला चढून आलो आहे. तुफान थंडी वारा होता आणि माझ्या मागे पुढे जवळपास 15 मिनिटे कोणीच नव्हते. फोटो काढायचा तरी कसा? मग एक युक्ती करून काढला खरा माझा आणि त्या दगडी फलकाचा एकत्र फोटो. तिथून निघालो, तो घाट उतरून लगेच दुसरा घाट चढलो. आता मी नकिला सर केला होता. इथेही परत तीच परिस्थिती होती, त्यामुळे त्याच पद्धतीने सेल्फी काढून पुढे निघालो. आता जरा सपाट प्रदेश सुरू झाला एका नदीच्या काठाकाठाने. तिथे छोट्या प्रमाणात का होइना, पण अगदी ग्रँड कनीअन सारखे दृष्य होते आणि खूपच शांत, फारशी वस्ती नसलेला प्रदेश. हळूहळू एका टपरीपाशी पोहोचलो तर तिथे अजय आणि इतर मंडळी बसलेली होती. तिथे कळले की निलेश पुढे मुलकिला तळावर गेलाय. तळ 8 किलोमीटरवर आहे. थोडी वाट पाहून निघालो आणि थेट तळावर पोहोचलो. आमचा तंबू बघून सामान टाकले व चहा प्यायला पळालो. इथेपण मस्त चहा आणि बिस्किटे मिळाली. थोडा अंधार पडू लागला होता तेंव्हा अक्षय दिसला. आजचे तंबू फक्त दोघांसाठी होते त्यामुळे तो आज दुसर्‍या तंबूत होता. हा अगदीच साधा फक्त जरुरीच्या गोष्टी असलेला तळ होता. थोड्यावेळाने एकदम अतुलच्या रडण्याने, मोठमोठ्यांदा ओरडण्याने जाग आली. तो पायात आकडी आली आहे, हुडहुडी भरली आहे, असं ओरडत होता. मेलोच अशा आविर्भावात तडफडत होता. मला ती आकडी कशामूळे आली ते काही कळेना, त्याला सांगता येइना. मग तो निलेशच्या नावाने शंख करायला लागला की त्याने कशी नीट व्यवस्था केली नाहीये. त्याला बोलवून आण, वैद्य आण. त्याचा एकूण ओरडा पाहून माझी चांगलीच पाचावर धारण बसली. म्हटलं इथे कित्येक मैल रुग्णालय तर सोडाच, वस्तीच नाही तर करायचे काय? मग त्याला विचारले, तुला मधुमेहामूळे ही आकडी आली आहे का? मग तो म्हणाला नाही, त्याने नक्कीच नाही. मग विचारले, तुला आकडीचा जास्त त्रास होतोय की थंडीचा? म्हणाला आकडीचा. मग म्हटलं, तुला पाणी कमी प्यायल्याने होतय का? पाणी किती प्यायलास? तर मग म्हणाला, अजिबातच पाणी प्यायलो नाहीये दिवसभरात. मग म्हटलं, चला काहीतरी करता येईल. एक लिटरची पाण्याची बाटली होती. त्यात एक पाऊच इलेक्ट्रॉल घालून प्यायला दिले. 5 मिनिटात आकडी कमी झाली. मी निलेशकडे जाऊन बोलावले. तो आला नाही; पण म्हणाला भरपूर पाणी दे त्याला आणि निधीला बोलाव. ती कुठल्या तंबूत आहे ते एका मुलीने दाखवले. बाहेरून तिला हाका मारल्या; पण ती गाढ झोपली होती त्यामुळे ऐकू गेलं नसणार. तंबूत परताना अक्षयला घेऊन आलो. त्याने अतुलचे पाय चेपायचा प्रयत्न केला; पण अतुलच्या फारच हालचाली होत होत्या, त्यामुळे जमले नाही. पुढील अर्ध्या तासात अतुलला थोडं थोडं करत सगळं इलेक्ट्रॉल पाजले. आता त्याची आकडी पूर्ण थांबली. मग म्हणाला, पाय प्रचंड गार पडलेत. मग त्याच्या अंगावर 2 गाद्या व 2 मोठ्या रजया टाकल्या; पण त्याची थंडी थांबेना. मग माझ्याकडे आम्ही घेतलेली वॉर्मी म्हणून गोष्ट होती. ते पाऊच फोडले, त्यातल्या पिशव्या त्याच्या पायात मोजे घालून त्यात टाकायच्या असं ठरवलं. मग माझे अतिरीक्त मोजे पायात घालून त्यात ते वॉर्मी घातले एका पायात एक. हळूहळू ते तापले व मग त्याला बरे वाटले. आता तो थोडा झोपला. मग मी अक्षयला तिथेच बसवून दुसर्‍या तंबूत जेऊन आलो. जेवण मस्त होते. येताना अतुलसाठीपण आणले होते. अक्षय आता जेवायला गेला. अतुलचे जेवण झाले व तो झोपला. मग मी अजून पांघरुणे मागवली व झोपलो.