पाण्याचे नियोजन म्हणजे काय?
   दिनांक :01-May-2019
पाण्याचे नियोजन म्हणजे काय ? या विषयी दोन गोष्टी सांगायच्या आहेत. नियोजन कशाचेही असो त्यामागे कमीत कमी वापर करून जास्तीत जास्त उत्पादन करणे हा हेतू असतो. पैशाचे नियोजन असेच केले जाते. कमीत कमी पैशात जास्तीत जास्त कामे कशी होतील ? याचा विचार करणे म्हणजे पैशाचे नियोजन. ते नियोजन करण्याआधी आपल्याकडे किती पैसे आहेत हे बघावे लागते. त्यानंतर आपल्या जवळ असलेल्या पैशातून कोणते काम करायचे आहे, त्याला किती पैसे लागणार आहेत याची माहिती घ्यावी लागते. पैसे कमी असतील आणि कामाची गरज मोठी असेल तर? आता काय करावे असा प्रश्न पडतो. मग सुरू होते नियोजन. पैशाची गरज नीट तपासली जाते. काही वस्तू खरेदी करायच्या आहेत तर त्या कमी भावात मिळतील का ? याचा अंदाज घेतला जातो. काही ठिकाणी माणसे लावली जातात. माणसांनी करायची कामे कमीत कमी माणसात कशी होतील याचा विचार केला जातो. काटकसर करून आपल्या जवळ असलेल्या पैशातच ते काम कसे करून घेता येईल याची कोशीश केली जाते. त्यालाच म्हणतात नियोजन.

 
नियोजन करायला सुरुवात करतो, तेव्हा एवढ्या पैशात हे काम होणे शक्यच नाही असे वाटत असते. पण काटकसरीचा विचार करायला लागतो. तसे ते काम तेवढ्या पैशात तर होतेच पण काही पैसे शिल्लकही राहतात. त्यामुळेच कोणताही व्यापारी आणि उद्योजक आपल्या जवळच्या साधनांचा आणि होणार्‍या खर्चाचा वापर बारकाईने विचार करीत असतो. शेतकरीवर्ग असे नियोजन करीत नाही. आपण पाण्याचा विचार करू. आपण शेतात उभ्या असलेल्या पिकाला पाणी देतो पण आपण देतो तेवढे पाणी त्या पिकाला आवश्यक आहे का? याचा विचार करीत नाही. याबाबत दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. पहिली गोष्ट म्हणजे पीक चांगले येण्यासाठी भरपूर पाणी लागत नाही. नेमक्या शब्दात सांगायचे तर पिकांना मोजकेच पाणी लागते आणि वेळेवर लागते. आपण जे पीक घेतो, त्या पिकाच्या वाढीच्या कोणकोणत्या अवस्थांत त्यात पाणी दिले पाहिजे, याची माहिती आधी घेतली पाहिजे आणि त्या त्या वाढीच्या अवस्थांत त्याला पाणी मिळेल याची योजना आखली पाहिजे. उगाच कधीही पाणी देत राहणे हा पाण्याचा गैरवापर आहे. या अवस्थेत सुद्धा आपण किती पाणी दिले पाहिजे याचा विचार करून तेवढेच पाणी दिले पाहिजे.
 
याबाबतीत लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे आपण झाडाला पाणी न देता झाडाच्या भोवतीच्या जमिनीला पाणी देत असतो. पाणी केवळ झाडाच्या बुंध्याला आणि त्यातल्या झाडाच्या मुळांना दिले पाहिजे. ते केवळ मुळांनाच मिळावे यासाठी काय करावे लागते याची माहिती घेतल्यास आपल्याला पाण्याची मोठीच बचत करता येईल. झाडांप्रमाणेच माणसालाही पाणी लागते. पाणी लागते म्हणजे प्यायला पाणी लागते. ते प्यायला लागते म्हणून आपण तहान लागताच पूर्ण शरीराला भिजवील एवढे पाणी अंगावर ओतून घेतो का ? नेमकेच आणि सरळ पोटात जाईल एवढेच पाणी तोंडाने भरतो ना ? मग हाच न्याय शेतातल्या पिकांना पाणी देताना लावायचा आहे. तेव्हा नेमके, वेळेवर आणि आवश्यक तेवढेच पाणी देण्याची योजना म्हणजे पाण्याचे नियोजन. पाण्याचे नियोजन करत असताना पाण्याची उपलब्धता आणि त्याचा वापर या संबंधात काही सामान्य माहिती तरी असणे आवश्यक आहे, जिला आजच्या काळामध्ये जलसाक्षरता असे म्हटले जाते. साक्षर माणसाला अक्षराची तोंडओळख असते. तशी शेतकर्‌याला पाण्याची तोंडओळख होणे गरजेचे आहे. तिलाच जलसाक्षरता असे म्हणता येईल.
 
महाराष्ट्रात 70 टक्के जमीन ही कायम जिरायत आणि पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहणार आहे. ही स्थिती बदलायची असेल तर उपलब्ध असलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त क्षेत्र भिजविण्यासाठी कसा वापर करता येईल, याचे नियोजन करावे लागणार आहे.