घ्या तांदळाचा खोडवा
   दिनांक :01-May-2019
जगाची लोकसंख्या वाढत आहे आणि या वाढत्या संख्येला पुरेल एवढे धान्य पिकवण्याचे आव्हान जगातल्या सार्‍या संशोधकांच्या समोर उभे आहे. संकरित बियाणे, भरपूर खते, पाण्याची सोय आदी उपायांनी धान्याचे उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न होत आहेत. चीनच्या युनान कृषी विद्यापीठाने याबाबत एक प्रयोग केला असून तांदळाच्या उत्पादनात मोठी वाढ करण्यात यश मिळवले आहे. तांदळाचे पीक हे खरीप हंगामात घेता येणारे किंवा पाण्याची सोय असल्यास कधीही घेता येणारे चार महिन्यांचे पीक आहे. चार महिन्यात येणारे हे पीक एकदा घेतले की त्याची कापणी केली जाते आणि त्यावर दुसरे पीक घेतले जाते. म्हणजे एकदा पेरल्यावर हे पीक एकदाच उत्पन्न देत असते पण युनान विद्यापीठात तांदळाचा खोडवा घेतला जात आहे.

 
महाराष्ट्रात उसाचा खोडवा घेतला जातो. एकदा लावलेला ऊस एकदा तोडला तरीही तिथे लगेच दुसरी लागवड करावी लागत नाही. तीन वर्षे तेच पीक येत रहाते. म्हणजे दुसर्‍या आणि तिसर्‍या पिकासाठी मुळातून मशागत करणे, सर्‍या काढणे आणि वाफे घोळणे तसेच बेणे आणून लागवड करणे ही कामे करावी लागत नाहीत. कष्ट आणि पैसा वाचतो. अशी सोय केवळ उसाच्या बाबतीतच आहे असे मानले जात होते पण तुरीच्या बाबतीत काही शेतकर्‍यांनी असा प्रयोग केला आहे. पाण्याची सोय असणार्‍या काही शेतकर्‍यांनी तुरीचा खोडवा घेतला असून एकाच लागवडीतून दोनदा पीक घेतले आहे.
 
चीनच्या युनान विद्यापीठात तयार करण्यात आलेल्या पी आर 23 या तांदळाच्या वाणात तर एका पेरणीवर पाच वर्षे पीक घेण्याची सोय आहे. या तांदळाच्या वाणाचे पहिले पीक घेतले जाते, तेव्हा नेहमीप्रमाणे भाताची मुळातून कापणी केली जात नाही. केवळ ओंब्या खुडून घेऊन रास केली जाते आणि नंतर पिकाला पाणी देऊन दुसरे पीक घेतले जाते. अशा रीतीने वर्षाला दोन पिके या हिशेबाने या वाणाची दहा पिके घेतली जातात. उसाच्या बाबतीत अशी सोय असल्याने आपल्या महाराष्ट्रात उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. पण आता तुरीवर हा प्रयोग यशस्वी झाला आणि तुरीवर पडणार्‍या रोगांवर प्रभावी इलाज सापडला तर तुरीचे पीक वाढणार आहेच पण अशीच सोय असणारी ही चिनी वाणाची माहिती कळून बियाणे उपलब्ध झाले तर भारतातही हे वाण पेरले जाऊ शकते. मानवतेला लागेल एवढे धान्य आपण निर्माण करू शकू की नाही, याची काळजी करणारांना हा नक्कीच दिलासा आहे.