चिखलदऱ्याच्या भीमकुंड दरीत उडी घेऊन दाम्पत्याची आत्महत्या
   दिनांक :01-May-2019
चिखलदरा येथील घटना
 
अमरावती: घरगुती वादातून पत्नी-पत्नीने चिखलदरा येथील प्रसिद्ध भीमकुंडच्या दोन हजार फूट खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता घडल्याने एकच खळबळ उडाली.
 

 
 
गणेश झगुजी हेकडे (वय 25), राधा गणेश हेकडे (वय 22, रा. शहापूर) असे दरीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावे असून त्यांना एक वर्षाचा बजरंग नामक मुलगा आहे. तो घटनेच्यावेळी घरीच होता. गणेश व राधाचे लग्न दोन वर्षांपूर्वी झाले होते. घरगुती वादातून तीन आठवड्यांपूर्वी रागाने राधा माहेरी म्हणजेच नजीकच्या मोथा गावी गेली होती. गणेशने काही दिवसांपूर्वीच मुलाला आपल्या घरी आणले होते. सततच्या वादातून कंटाळल्यामुळे त्याने बुधवारी सकाळी मोथा येथे सासरी जाऊन राधाला दुचाकीवरून आणले. यादरम्यान दोघेही भीमकुंड दरीत जाऊन आत्महत्या करणार असल्याचे त्यांनी राधाच्या काकांना सांगितल्यामुळे काका सुदेश महादेव निखाडे लागलीच त्यांच्या मागावर गेले. त्यानंतर काकांना दोघेही शहापूर येथे गेले नसल्याचे कळले. त्यांनी चिखलदरा पोलिसांत ततक्रार दिली. पोलिसांनीही तात्काळ भीमकुंड पॉइंट वर जाऊन पाहणी केली असता दोघांनी उडी घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून चिखलदरा ठाणेदार आकाश शिंदे व सहकारी दरीतून मृतदेह काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.