राज्यात उन्हाचा तडाखा ; उष्माघाताच्या रुग्णात मोठी वाढ

    दिनांक :01-May-2019
 मुंबई- विदर्भ-मराठवाड्यातील तापमान उच्चांक गाठत असतानाच, अन्य भागांतील उष्णतेमुळे लोकांचे हाल होत आहे. 
मुंबई, ठाण्यासारख्या किनारी भागातील दमट हवेमुळे उष्माघाताचा धोका नसला, तरी कडक उन्हामुळे चक्कर येणे, अस्वस्थता ही लक्षणे मुंबईकरांमध्ये दिसून येत आहेत. गेल्या दोन महिन्यांत उष्माघाताचा त्रास झालेल्या १९६ रुग्णांनी राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेतले आहेत, तर अनेकांचा मृत्यू झाला आहे.

 
 
 
वाढत्या उकाड्याचा त्रास राज्यभर नागरिकांना जाणवू लागला आहे. उष्माघात नियंत्रण कक्षाकडील माहितीनुसार, उष्माघातामुळे गेल्या दोन महिन्यांत राज्यभरातील १९६ जणांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. याशिवाय परभणी, धुळे आणि औरंगाबाद येथील प्रत्येकी एक रुग्ण दगावला आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात कडक उन्हाचा सामना कमी प्रमाणात करावा लागत असला, तरी उष्म्याचा त्रास या ना त्या स्वरूपात होत राहतो. अनेकांना त्यांचा शारीरिक त्रास हा उष्णतेमुळे होत असल्याचेही पटकन लक्षात येत नाही. अस्वस्थता, मानसिक गोंधळ हीदेखील याचीच लक्षणे आहेत. त्यामुळे असा त्रास जाणवू लागल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.