महाराष्ट्र दिनी नेहरू स्टेडियमवर ध्वजवंदन पथसंचलनाने वेधले लक्ष
   दिनांक :01-May-2019
अमरावती: महाराष्ट्र ही संतांची व शूरवीरांची भूमी असून, तिला पराक्रम व त्यागाची थोर परंपरा आहे, असे उद्गार पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त आयोजित मुख्य ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी काढले.
 

 
 
येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर मोठ्या उत्साहात हा सोहळा झाला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, बांधकाम सभापती जयंतराव देशमुख, श्रीमती कमलताई गवई, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, पोलीस अधिक्षक दिलीप झळके आदी यावेळी उपस्थित होते. सोहळ्यात प्रारंभी पालकमंत्री श पोटे पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन व राष्ट्रगीत झाले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी वाहनातून मैदानावर फेरी मारून विविध पथकांचे निरीक्षण केले. पालकमंत्र्यांनी आपल्या मनोगतात प्रारंभी संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणा-या हुतात्म्यांना व योगदान देणा-या सर्व थोर विभूतींना अभिवादन केले व जिल्ह्यातील नागरिकांना महाराष्ट्रदिन व कामगारदिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, महाराष्ट्र ही शूरवीरांची आणि संतांची भूमी आहे. राज्याला त्यागाची, पराक्रमाची व देशप्रेमाची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजासारखे शूर व आदर्श प्रशासक, संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांपासून ते संत गुलाबराव महाराज, संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबापर्यंत असे अनेक संतांच्या विचारांतून ही भूमी घडली. राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असा वैचारिक वारसा या भूमीला आहे. जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक, राजकीय सुधारणांच्या चळवळीत डॉ. पंजाबराव देशमुख, शिवाजीराव पटवर्धन, दादासाहेब खापर्डे यांनी मोठे योगदान देऊन वैचारिक परंपरा समृद्ध केली आहे. या महाराष्ट्रभूमीत अमरावती जिल्ह्याचेही स्थान महत्वपूर्ण आहे. मराठीतील पहिला आद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ या भूमीत लिहिला गेला आहे. महाराष्ट्रभूमीचा हा संस्कृतीसंपन्न वारसा आणि लौकिक यापुढेही वृद्धिंगत होत राहणार आहे, असेही ते म्हणाले.
 
विविध पथकांकडून शानदार संचलन
यावेळी पोलीस व सुरक्षा दलाच्या विविध पथकांनी कौशल्यपूर्ण संचलन करून उपस्थितांची मने जिंकली. शहर विशेष शाखेच्या पोलीस निरीक्षक निलिमा आरज यांनी परेड कमांडर म्हणून, तर राखीव पोलीस उपनिरीक्षक रवी बान्ते यांनी दुय्यम कमांडर म्हणून जबाबदारी सांभाळली. संचलनात आठ प्लाटून व 280 कर्मचा-यांचा समावेश होता.
नक्षलग्रस्त भागात कर्तव्य बजावणारे राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 9, शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तत्पर शहर पोलीस पथक, जलद प्रतिसाद पथक व दंगा नियंत्रण पथक, ग्रामीण पोलीस पथक, महिला पोलीस पथक, गृहरक्षक दल, वाहतूक दल, बँड पथक, श्वान पथक, दामिनी पथक, वज्र वाहनपथक, वरूण वाहनपथक, फॉरेन्सिक व्हॅनपथक, महापालिकेचे अग्निशामक वाहनपथक आदींनी यावेळी शानदार संचलन केले.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी- कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांची मोठी उपस्थिती होती.