नक्षल्यांनी रस्त्याच्या कामावरील २७ वाहने जाळले
   दिनांक :01-May-2019
 
कुरखेडा: राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा होत असताना काल रात्री सशस्त्र नक्षल्यांनी रस्त्याच्या कामावरील तब्बल २७ वाहने जाळल्याची घटना कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे घडली.
 

 
 
पुराडा-मालेवाडा-येरकड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३६ चे काम सुरु असून, हे काम दुर्ग येथील अमर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीद्वारे करण्यात येत आहे. या कंपनीचा दादापूर येथे गावाशेजारीच डांबर प्लांट असून, दोन कार्यालयेही आहेत. तेथे अनेक वाहने होती. काल रात्री दीडशेहून अधिक सशस्त्र नक्षली दादापूर येथे गेले. त्यांनी संपूर्ण गावभर शासनाविरोधात मजकूर लिहिलेले बॅनर लावले आणि नंतर वाहने व अन्य यंत्रसामग्रीला आग लावली. या आगीत ११ टिप्पर, डांबर पसरविणारी मशिन, डिझेल व पेट्रोल टँकर, मोठे रोलर अशी तब्बल २७ वाहने, मोठे जनरेटर व दोन कार्यालये जळाली. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे