जेवणाच्या जागेवरून झाली हाणामारी; एकाचा मृत्यू

    दिनांक :01-May-2019
 
नांदेड : तेलंगणा सिमेलगत असलेल्या व्यंकटराव नाईक तांडा येथे एका लग्न समारंभात जेवणाच्या जागेवरून झालेल्या वादाचे रुपांतर  मारहाणीत झाले.  यात  एका जखमी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी इस्लापूर पोलिसांनी तिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ३ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 
 
 
किनवट तालुक्यातील व्यंकटराव नाईक तांडा येथे २६ एप्रिल रोजी टिळ्याचा कार्यक्रम होता. यानिमित्त तेलंगणा राज्यातील कुबेर मंडळातील गालासिंग तांडा येथील रहिवासी रवी बळीराम पवार, श्रावण रामजी चव्हाण, मांगीलाल चव्हाण, रोहिदास चव्हाण हे व्यंकटराव नाईक तांडा येथे आले होते. यावेळी जेवणासाठी बसण्याच्या जागेवरून गालासिंग तांडा येथील लोकांमध्ये वाद निर्माण झाला. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या मारहाणीत श्रावण चव्हाण, मांगीलाल चव्हाण, रोहिदास चव्हाण या तिघांनी रवी पवार यांना लाथा बुक्कय़ांनी मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी तेलंगणातील भैसा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर येथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना निजामाबाद येथे नेण्याचा सल्ला दिला. दरम्यान जखमी रवी पवार यांना निजामाबाद येथे नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.