गडकरींच्या इशार्‍याने पाकिस्तान हादरला
   दिनांक :10-May-2019
-जागतिक बँकेकडे धाव
 
 
इस्लामाबाद, 
पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवल्या नाही, तर या देशाला होणारा पाणीपुरवठा भारत बंद करेल, या केंद्रीय जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांच्या इशार्‍यामुळे पाकिस्तान चांगलाच हादरला आहे. दोन्ही देशात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पाकिस्तानने जागतिक बँकेच्या लवादाकडे दाद मागितली आहे.
 
पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैजल यांनी पत्रकारांशी बोलताना, सिंधू जलकरारावरून भारत सरकारने केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. या जलकरारावर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांच्या स्वाक्षर्‍या आहेत; मात्र भारत सातत्याने या कराराचे उल्लंघन करण्याची भाषा करीत आहे. आता यावर जागतिक बँकेच्या लवादानेच तोडगा काढावा, अशी मागणी पाकिस्तान सरकार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीतील एका जाहीर सभेत बोलताना, दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानला धारेवर धरले आणि पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवल्या नाही, तर भारत सिंधू जलकरार मोडून, पाकिस्तानला होणारा पाणीपुरवठा बंद करेल. सिंधू जलकरारात अनेक अटी आहेत. दोन्ही देशांमध्ये बंधुत्व वाढावे, शांतता प्रस्थापित व्हावी आणि सहकार्य वाढवणे हे या करारामागचे उद्दिष्ट होते, पण शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानकडून भारताला कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याने हा करार मोडण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे, असा स्पष्ट इशारा गडकरी यांनी दिला होता.
 
जागतिक बँकेच्या पुढाकारातून भारत आणि पाकिस्तानने १९ सप्टेंबर १९६० रोजी सिंधू जलकरारावर स्वाक्षर्‍या केल्या होत्या. त्यानुसार हिमालयात उगम पावणार्‍या आणि पाकिस्तानात प्रवेश करणार्‍या सहा नद्यांपैकी व्यास, रावी आणि सतलज या तीन पूर्वेकडील नद्यांचे पाणी भारताच्या वाट्याला आले, तर सिंधू , चिनाब आणि झेलम या पश्चिमेकडील तीन नद्यांमधील पाण्याचा हक्क पाकिस्तानला मिळाला आहे.