आमच्या हिताला धक्का लागला, तर परिणाम गंभीर
   दिनांक :10-May-2019
- अमेरिकेचा इराणला गंभीर इशारा 

 
 
तभा ऑनलाईन  
वॉशिंग्टन,
आमच्या हिताला किंवा आमच्या नागरिकांच्या जिवाला किंचित जरी धक्का लावाल, तर त्याचे अतिशय गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकेने आज इराणला दिला आहे.
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच इराणच्या लोखंड, पोलाद आणि धातू क्षेत्रावर आजवरचे सर्वाधिक कडक निर्बंध लादले आहेत. मध्य-पूर्वेत इराणचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आणि या देशाला अण्वस्त्र प्राप्त करण्यापासून परावृत्त करण्यासाठी अमेरिकेने हे कठोर पाऊल उचलल्यानंतर इराणने अमेरिकन हितावर मोठा आघात करण्याची धमकी दिली होती. याच अनुषंगाने अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माईक पोम्पियो यांनी इराणला गंभीर परिणामांचा इशारा दिला.
 
इराणने एक गोष्ट नेहमीकरिता लक्षात ठेवावी की, या देशाने आमच्या हितावर कुठलाही आघात केल्यास, आम्ही मुळीच शांत बसणार नाही. आम्हाला होणार्‍या लहानशा नुकसानीची फार मोठी किंमत तुम्हाला भोगावी लागेल, असे पोम्पियो यांनी जारी केलेल्या एका निवेदनात स्पष्ट केले.
 
आम्ही शांत आहोत, याचा अर्थ आम्ही ठाम नाहीत किंवा आम्ही कमजोर आहोत, असा काढला जाऊ नये. अशा प्रकारच्या तणावात तुम्ही भविष्यात कुठलाच विकास साधू शकणार नाही, असेही त्यांनी यात म्हटले आहे.