'गंभीर'साठी लक्ष्मण आणि हरभजन राजकीय मैदानात
   दिनांक :10-May-2019
नवी दिल्‍ली, 
पूर्व दिल्‍लीतील भाजप उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने आप उमेदवार आतिशी मार्लेना यांच्या विरोधात अश्‍लील टिप्पणीची पत्रके वाटल्‍याचा मार्लेना यांनी आरोप केला आहे. गंभीरने मार्लेना यांना या आरोपांवरुन अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. गंभीरच्या नोटीशीनंतर मार्लेना यांनी दिल्‍ली महिला आयोगाकडे गंभीरविरोधात तक्रार दाखल केली. या दोघांचा वाद सुरु असतानाच आता भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि फिरकीपटू हरभजन सिंग यांनी गंभीरची पाठराखण केली आहे. 
 
हरभजनने ट्विट करून गंभीरला पाठिंबा दिला आहे. "गौतम कधी कोणत्‍याही महिलेच्या विरोधात अशी टिप्पणी करणार नाही, मग त्‍याचा पराभव होईल किंवा तो जिंकेल", असे ट्विट हरभजनने केले. "मी खूप चांगल्‍या प्रकारे त्‍याला ओळखतो. तो कधीच कोणत्‍याही महिलेविरोधात अशी टिप्पणी करणार नाही. मग तो जिंकेल किंवा हारेल, ही गोष्‍ट वेगळी आहे. परंतु, हा माणूस या सर्वांच्या वरती आहे."
 
 
गंभीरवर लावण्यात आलेल्‍या आरोपांवर व्ही. व्ही. एस लक्ष्मण यानेही गंभीर असे करणार नसल्‍याचे म्‍हटले आहे. त्‍याने केलेल्‍या ट्विटमध्ये म्‍हटले आहे की, ‘‘बातमी ऐकून मी स्‍तब्‍धच झालो आहे. गंभीरला मी तब्‍बल दोन दशकांपासून ओळखत आहे. त्‍यामुळे त्‍याचा प्रामाणिकपणा, त्‍याचे चारित्र्य आणि त्‍याच्या मनात महिलांविषयी असलेल्‍या आदराची मी खात्री देवू शकतो.’’
 
 
दरम्‍यान, गंभीरने आपल्‍यावर लावण्यात आलेल्‍या आरोपानंतर दिल्‍लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि अतिशी मार्लेना यांना नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगितले आहे. या नोटीशीत गंभीरने म्‍हटले आहे की, माझ्यावर करण्यात आलेले आरोप विनाशर्त मागे घ्‍या आणि माझी माफी मागा.’’ याबरोबरच गंभीरने आपल्‍या ट्विटरवरुन म्‍हटले आहे की, माझ्यावर लावण्यात आलेले आरोप सिध्द झाले तर मी निवडणुकीतून माघार घेईन.