घराची गोष्ट
   दिनांक :10-May-2019
घरची गोष्ट 
अवंतिका तामस्कर   
 
शरीरात पुरेसे पाणी असणे अत्यंत महत्त्वाचे असते. जे व्यायाम करतात, त्यांनी इतरांपेक्षा दीड लिटर पाणी जास्त प्यावे. पाणी व्यायामामध्ये असो वा रोजच्या जीवनात, पाणी हा घटक खूप महत्त्वाचा आहे. कारण आपण खातो ते अन्नपदार्थ पाण्याच्या माध्यमातूनच अख्ख्या शरीरभर पसरवले जातात. ऑक्सिजन आपण घेत असतो. पण पाण्याद्वारेच आपले रक्त हृदयापर्यंत पोहोचते. 
 
 
शरीर हायड्रेट असेल तर कोणत्याही प्रकारचा आजार होऊ शकत नाही. पचनाशी संबंधितही कसला त्रास होणार नाही किंवा मसल्स क्रॅम्पसारखे प्रकारही होत नाहीत. डिहायड्रेशन झालं तर बर्‍याच लोकांना लुज मोशन किंवा डायरियासारखे विकार होऊ शकतात. पाणी पुरेसे प्यायलात तर शरीर योग्य प्रमाणात हायड्रेट राहाते आणि त्याचा परिणाम तुमच्या सगळ्या क्रियांवर होत असतो. मग त्या हृदयाच्या असतील, मसल्सच्या असतील किंवा आणखी काही सगळं चांगलं सुरळीत चालू राहातं. लिव्हर आणि किडणीची फंक्शन्सही चांगल्या राहतात. या सगळ्या ॲक्टिव्हीटीज पाणी शरीरात चांगले असेल तर योग्य प्रकारे होत असतात.
 
शरीराच्या सगळ्या क्रिया नीट होण्यासाठी सकाळी उठल्यावर दोन ग्लास पाणी प्यायचे. यामुळे खूप फरक जाणवेल. खाल्लेल्या अन्नाचे चांगले पचन होण्यासाठीही पाणी महत्त्वाचे आहे. आंघोळीला जाण्याआधी पाणी प्यायले तर कमी रक्तदाब असलेल्यांना फायदा होतो. रात्री झोपण्यापूर्वीही एक ग्लास पाणी प्यायल्यास हार्टअटॅक टाळता येतो.
 
व्यायाम करताना किंवा व्यायाम झाल्यावर बर्‍याच जणांना हातापायांना क्रॅम्प येतात. मसल्स क्रॅम्प म्हणतात त्याला! पण हे त्याचवेळी होते जेव्हा तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण एकदम खाली येते पण व्यायामातही ठरावीक प्रमाणात पाणी पित राहाल तर अशा प्रकारचे मसल्स क्रॅम्प येणार नाहीत आणि तुमचा परफॉर्मन्स वाढतो. कारण आपण जेवतो ते अन्न पचण्यासाठीही पाणीच उपयोगी ठरते. पाणी कमी प्यायले तर अन्न नीट पचत नाही. जेवत असतानाही कधी पाणी प्यायचे नाही. एकतर जेवण्याच्या अर्धा तास आधी प्यायला हवे, नाहीतर जेवल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यायला पाहिजे. बरेच लोक जेवताना पाणी पितात. काही लोक जेवल्यानंतर लगेचच घटाघटा पाणी पितात. हेही एकदम चुकीचे आहे.
घोटभर पाणी प्या!
 
व्यायाम करत असताना पाणी प्यायचे नाही, असा एक गैरसमज आहे. पण हे अगदी चुकीचे आहे. वास्तविक व्यायाम करतानाही एक लिटरपर्यंत पाणी पिऊ शकता. प्रत्येक एक स्टेप पूर्ण झाल्यानंतर घोट घोट पाणी पिता येईल. म्हणजे व्यायाम करताना मध्येच एक-दोन ग्लास पाणी प्यायचे नाही. ते घोट घोटच प्यावे लागेल. व्यायामाची एक स्टेप झाली की एक घोट पाणी प्यायले चालू शकेल. कारण व्यायाम करत असता तेव्हा तुम्हाला घाम खूप जास्त येतो. घामामुळे शरीर डिहायड्रेट व्हायला सुरुवात होते. त्यावेळी शरीरात पाणी पुरेसे राखण्यासाठी पाण्याची गरज असते. व्यायाम करताना काही जणांचा घसा सुकायला लागतो. अशावेळी श्वास घ्यायलाही त्यांना त्रास होऊ शकतो. हे टाळायचे असेल तर घोटभर पाणी पिणे चांगले!