मनातील प्रश्न
    दिनांक :10-May-2019
 प्रॉक्सी थॉट
 पल्लवी खताळ-जठार 
 
नमस्कार मैत्रिणींनो! अनेक पालकांचे मेल प्राप्त होत आहेत. अनेक सख्यांचे प्रश्न मनात गोंधळ निर्माण करणारे असतात. आजची पिढी इतकी अपडेटेड असते की एक आई म्हणून त्यांना ट्रिट करताना प्रत्येक आईची तारांबळ उडते. आपल्या मुलांनी विचारलेल्या प्रश्नांचे योग्य उत्तर नाही दिलीत की आपली मुलं लगेच ‘माझ्या आईला काहीच येत नाही,’ असे बोलून मोकळी होतात. अर्थात मुलांना हे थोडीच ठाऊक असतं की आई एक असे यंत्र आहे जे आयुष्याच्या प्रत्येक विषयात अविरत कार्यशील असतं. असो! आजचा मुद्दा मांडताना मी एक घटनेचा आधार घेतेय्‌ म्हणजे दीप्ती सावजी, मृदुला कुलकर्णी आणि अंजली पाचपुते यांंच्या समस्येवर त्या नक्कीच मार्ग काढू शकतील.
 
 
दोघं दमून भागून घरी आले. ती आणि तिचा १४ वर्षांचा मुलगा. शेजारी पाजारी, नातेवाईक, मग त्यांच्या ओळखीचे लोक असं करत तिनं आणि त्यानं घरगुती पदार्थ विकायचा सपाटा लावला होता. दरवेळी दरवाजा ठोठावला की- अपेक्षित प्रतिसाद मिळायचाच असंही नाही. पण प्रत्येक बंद दरवाजा नवा दरवाजा उघडण्याची प्रेरणाच त्यांना देत गेला. म्हणूनच अनोळखी दरवाजे आणि शाळा, बस इथेही घरगुती पदार्थ विकण्याचं त्यांना हळूहळू धाडस आलं.
 
तसं खाऊन पिऊन ठीक होतं घरचं. नवरा एका कंपनीत बेतास होता नोकरीला. एकच मुलगा. तोही समंजस. ती काटकसरी. त्यामुळे अनाठायी चैन आयुष्यातून वजा. पण मुलाचं स्वप्न हळूहळू फुलायला लागलं होतं. दरवाजाच्या दोरीला बांधून ठेवलेल्या चेंडूला, तिच्या कपडे धुण्याच्या धुपाटण्यानं टोलवता टोलवता गल्लीपासून शाळेतल्या क्रिकेट टीमचा आणि आता हॅरिस शील्डच्या मॅचचा कॅप्टन होण्याची मजल त्यानं गाठली होती. हे सगळं अभ्यास सांभाळून असल्यानं नवर्‍यालाही काही तक्रारीला जागा नव्हती. पुढचं वर्ष दहावीचं. तेव्हा अभ्यासाकडे दुर्लक्ष नको, अशी समज तो देत राहायचा इतकंच.
 
पण त्या दिवशी कहरच झाला. मुलानं हॅरिस शील्डच्या कोचिंगसाठी साधारण 5000 रु. चा खर्च आहे असं सांगितलं. बॅट, पॅड, ग्लोव्हज्‌, शूज आणि नवर्‍यानं सचिन होणार आहेस का तू? असं विचारत मुलाच्या हातातल्या चेंडूचे सुरीनं दोन तुकडेच केले. सामान्यांनी भलती स्वप्नं पाहायची नसतात हे कटुसत्य स्वीकारायचं जेव्हा त्यांनी दरडावून सांगितलं, तेव्हा मात्र कधी नव्हे तो मुलानंही रडतच, पण एक प्रश्न विचारलाच. म्हणाला- तुम्ही सुद्धा शिक्षणाचं स्वप्न पुरं करायला खेड्यातून पळूनच आलातना नागपूरला. तुम्ही शेती करावी असं वाटणार्‍या आजोबांच्या दृष्टीनं भलतंच स्वप्न होतं ना हो. मुलाच्या या प्रश्नाला त्याच्या वडिलांकडे उत्तर नव्हतं आणि तिच्या डोळ्यात पाण्याशिवाय दुसरं काही नव्हतं.
 
पण त्याच्या स्वप्नाला जपायचं तिनं ठरवलं. म्हणूनच घरगुती पदार्थ विकण्याचं त्यांनी ठरवलं. नवर्‍यानंं विरोध केला नाही, पण मदतीचा उत्साहही दाखवला नाही. तिची धडपड, तांदळाच्या डब्यात ठेवलेले पैसे हे सगळं मात्र तो गुपचूप पहात होता. रोज रात्री ती आणि मुलगा किती पैसे जमले ते बघत होते.
 
आजही त्यांनी कमवलेले पैसे ठेवण्यासाठी डबा उघडला आणि त्यांना धक्काच बसला. डबा रिकामा. संध्याकाळीच नवर्‍याला कुणाशी तरी बोलताना तिनं ऐकलं होतं, ‘‘कुठे? त्या बारजवळ? येतो येतो.’’ तिच्या पायाखालची जमीन सरकली. ‘‘का केलं असं बाबांनी?’’ असं म्हणत अश्रूभरल्या डोळ्यांनी मुलानं बसकण मारली आणि त्याचे दोन अश्रू गालावरून ओघळले.
 
तिनं आणि मुलानं वर पाहिलं तर तो तिचा नवरा हसर्‍या चेहेर्‍यानं उभा होता. म्हणाला- माझ्या जमवलेल्या पैशांत तुमच्या पैशांची भर घातली आणि घेतली बॅट. माझा सचिन आहेस तू खेळायच्या आधीच हरलेला कसा बघेन मी तुला?
 
तिच्या डोळ्यातले अश्रू आणि मुलाच्या गळ्यातला हुंदका पहिल्या थेंबासारखा त्यांच्या डोक्यावर पडला.
 
मैत्रिणींनो, तुम्हीपण समस्या आहे म्हणून घरात बसून राहू नका. परिस्थिती ही आपल्या बरोबर आपल्या पाल्याला देखील हातपाय हलवायला शिकवते. कुठलाही उद्योग छोटा िंकवा मोठा नसतो. तुम्ही सुरुवात करा. त्यात वेळ सांभाळून आपल्या मुलांनाही सहभागी करा. कारण आपली आई आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हे परिश्रम घेते हे प्रत्येक मुलाला माहिती असते.
 
संस्कृत शिक्षिका,
महाल, नागपूर
 
प्रॉक्सी थॉटमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करील. त्याकरिता तुम्हाला मोजक्या शब्दांत तुमचा प्रश्न, तुमच्या मुलाचे वय, तुमचे संपूर्ण नाव लिहून [email protected] वर मेल करायचा आहे.