काही व्रतस्थ पुरुष!
   दिनांक :10-May-2019
सुप्रिया अय्यर  
9850328634 
 
चातुर्मास सुरू झाला की, आजी कुठलीतरी पोथी वाचत असे. कधी हरिविजय, कधी वाल्मिकी रामायण किंवा कधी भागवत. ते ऐकायला आजूबाजूच्या स्त्रिया गोळा होत. त्या अतिशय साध्या, संसारी बायकांना पोथी कळत नसे अन्‌ आजी त्यांना अतिशय सोप्या शब्दांत रसाळ वाणीनं त्याचा अर्थ विशद करीत असे. तिलाही ते ऐकण्याची गोडी लागली. त्यातून अनेक गोष्टी कळत गेल्या. त्या खर्‍या अर्थानं किती कळल्या कुणास ठाऊक; पण मनावर त्याचे कायम ठसे उमटले. महाभारताच्या संदर्भात असं म्हटलं जातं की, जगातील एकही असा प्रसंग नसेल की जो महाभारतात घडला नाही! श्री व्यासांच्या अफाट बुद्धिमत्तेला माणसानं आपल्या कुवतीनुसार दिलेली ही दादच म्हणायची. महाभारतातील पितामह भीष्माची शोकांतिका आजही तिला आत आतपर्यंत व्यथित करते.
 
पिता शंतनू, मत्स्यकन्या सत्यवतीच्या प्रेमात पडला अन्‌ तिला लग्नाची मागणी घातली. तेव्हा सत्यवतीच्या पित्यानं अट घातली की, शंतनूच्या साम्राज्याचा वारस सत्यवतीचा मुलगाच होईल. त्या क्षणी शंतनूच्या पुत्रानं- देवव्रतानं- केलेली ‘आजन्म ब्रह्मचर्याची’ प्रतिज्ञा अन्‌ व्रत समजून आयुष्यभर केलेलं प्रतिज्ञेचं पालन. एका महापराक्रमी पुरुषानं पित्याच्या कामेच्छेसाठी स्वत:च्या आयुष्याचा होम करावा अन्‌ पित्याने तरुण मुलाचा अशाप्रकारे बळी घ्यावा, हे सारे म्हटले तर अतर्क्यच आहे; पण नकळत्या वयात जेव्हा हे ऐकले, तेव्हा शंतनूची तीव्र कामेेच्छा ओलांडून मन फक्त विचार करू लागलं ते देवव्रताच्या प्रतिज्ञेचं...
 
 
एका संन्यस्त प्रवासाची ती सुरुवात होती. त्याला निमित्त पिता झाला, तरी आयुष्यभर ती निभावण्याचं व्रत तर स्वत: भीष्मानंच निभावलं. पुरुषाची एक नवीनच प्रतिमा मनात विराजमान झाली. मग ध्यानात आलं की, केवळ ‘मला तू हवी आहेस’ एवढ्या एकाच मागणीत न अडकणारे अनेक देवव्रत समाजात आहेत. स्वत:च्या निष्ठा आणि मूल्यांसह जगणारे अनेक श्रेष्ठतम पुरुष. अवघ्या बावीस- तेवीसच्या कोवळ्या वयात स्वातंत्र्याच्या वेदीवर बलिदान करणारे भगतसिंग , राजगुरू अन्‌ सुखदेव खरेच कोणत्या मातीचे बनले असतील? काळ्या पाण्याच्या शिक्षेत कालकोठडीत खितपत पडलेल्या सावरकरांची जात तरी कोणती? दिवस, रात्र, महिने उलटत असताना कुठल्याही जिवंत माणसाशी संवाद नसताना, केवळ कोठडीतल्या छोट्याशा खिडकीत घडीभर येऊन बसणार्‍या पाखराशी दिवसभराचं सारं बोलून घेणार्‍या सावरकरांसारख्या पुरुषातला पुरुष ओळखणं हे काय सोपं काम आहे? अन्‌ अगदी तिला स्वत:च्या अवतीभवतीच अशी कितीतरी उदाहरणं दिसू लागली.
 
जेव्हा टी.बी. नावाचा रोग रुग्णाचं मृत्युपत्रच स्वत:सोबत घेऊन अवतरायचा, त्या काळात या रोगाची रुग्ण असणार्‍या पत्नीची काळजी घेणारा, तिच्या मृत्युपश्चात दुसरं लग्न न करता मुलांचा सांभाळ करणारा अन्‌ त्याच वेळी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी असणारा पिता वास्तवात असू शकतो, हे तर तिनं स्वत:च्या गोतावळ्यात अनुभवलेलं सत्य. तोवर फक्त एकच माहीत होतं की, पुरुषाच्या जाण्यानंतर स्त्रीनं दुसर्‍या लग्नाचा विचारही न करता व्रतस्थ आयुष्य जगायचं असतं. पुरुषाला मात्र कुठल्याही वयात कितीही लग्नं करण्याची मुभा. पतीच्या मृत्यूचा शोक पांढर्‍या कपाळानं आणि अंगावरील पांढर्‍या कपड्यांतून कायम जाहीर करणार्‍या पतिहीन स्त्रिया एकीकडे अन्‌ त्याच वेळी पत्नीच्या मृत्यूचे दु:ख (?) मागे सारून वर्षाच्या आत दुसर्‍या लग्नासाठी बोहोल्यावर चढलेले नवरदेव, अशा परस्पर भिन्न वातावरणात वावरत असतानाही कधीतरी लख्खकन वीज चमकावी तसं पुरुषाचं चांगुलपण डोळ्यांसमोर प्रकाशमान होत असे.
 
पुरुषप्रधान संस्कृतीच्या अनेक अघोषित नियमांपैकी एक महत्त्वाचा नियम म्हणजे स्त्रीला निर्णयप्रक्रियेत काडीचेही स्थान नाही. सत्तेच्या केंद्रस्थानी नेहमीच पुरुष विराजमान झालेला अन्‌ मग या एकतर्फी निर्णयप्रक्रियेमुळे जोडीदारावर संपूर्ण अन्याय झाला, तरी तो दुर्लक्षित आणि पुरुषाच्या निर्णयाचे गोडवे गायले गेले. मनात असेही येते की, लक्ष्मण जेव्हा वनवासाला निघाला तेव्हा ऊर्मिलेने काय त्याला म्हटले नसेल की, ‘‘मीही तुमच्यासोबत वनवासात येते.’’
 
अगदीच मानवीय पातळीवर उतरून विचार करायचा झाला, तर तिलाही असे नक्कीच वाटू शकते की, ‘‘मोठ्या जावेला मात्र वनात पतीसोबत जाण्याचा अधिकार अन्‌ मला का नाही?’’
 
तिचं वनात येणं नाकारताना लक्ष्मणानं काय उत्तर दिलं असेल तिला? तिच्या मनाचा विचार न करता स्वत:चा निर्णय लादला असेल तिच्यावर? तसंच होण्याची शक्यता अधिक आहे. महात्मा गांधींनी ब्रह्मचर्याचे प्रयोग सुरू केले तेव्हा बांची अनुमती जरी घेतली असेल, तरी खरेच काय ती बांनी मनापासून दिली असेल? आणि जरी तशी ती दिली असेल, तरी या ब्रह्मचर्याच्या वाटेत बांचं मोठेपण कितपत अधोरेखित झालेलं आपल्याला दिसतं?
 
आणखी असंच एक हळुवार, कोवळं नातं जपणारा पुरुष म्हणून कृष्णच डोळ्यांपुढे येतो. ‘सोळा सहस्त्र नारी, तरीही मी ब्रह्मचारी!’ म्हणणारा कृष्ण नक्की होता तरी कसा? इतर नारी सोडल्या, तरी आठ राण्या असतानाही नात्यापलीकडे जाऊन राधेवर प्रेम करणारा कृष्ण खरा, की कुब्जेवर प्रेम करणारा कृष्ण खरा? आजतागायत कुणालाही या प्रश्नाचं उत्तर सापडलेलं नाही. राधा काय किंवा कुब्जा काय, त्यांच्या संदर्भात कुठलीही बेडी कृष्णाच्या पायात नव्हती, तरीही त्यानं असोशीनं ही नाती सांभाळली.
 
पुरुष नावाच्या जातीच्या अंतरंगात शिरताना असे अनेक पुरुष सहवासाला आले. ते सारे प्रत्यक्षात भेटले, असा तिचा दावा मुळीच नाही; पण जिथे, ज्या वळणावर भेटले तिथे, त्या वळणावर स्वत:ची एक प्रतिमा तिच्या अंत:चक्षूवर साकार करून गेलेत. शंतनू, देवव्रत (भीष्म पितामह), भगतसिंग , सुखदेव, राजगुरू, सावरकर, गांधी, लक्ष्मण, कृष्ण अशी वेगवेगळी नावं धारण केलेल्या अनेक पुरुषप्रतिमा... त्या कळल्याचा दावा नाहीच; पण त्यांना स्वत:च्या मर्यांदासह समजून घेण्याचा प्रयत्न तर नक्कीच करता आला. या नंतरही आयुष्याच्या अनेक थांब्यांवर अनेक पुरुष भेटत गेले. कुणी दु:ख दिले, कुणी सुखाची ओंजळ उधळली, तर कुणी अनपेक्षित अनुभवांचा नजराणा देऊन विद्ध केले, समृद्ध केले.