व्रत माझं हसत पाहुण्याचं...
   दिनांक :10-May-2019
अनुराधा मोहगांवकर
0752-241594
 
'विनायकाची सरस्वती’ म्हणून मोठ्या हौशीनं आपट्यांच्या घरी उंबरठ्यावरचं माप ओलांडून आल्यावर, तापी नाव बदलून सरस्वती नाव ठेवलं. पण, सरस्वती कुणी म्हणतच नाही. यांचा संघमित्रांचा पसारा एवढा अफाट की, मी कुणाची ‘वहिनी’, तर कुणाची ‘ताई’ कधी झाले, कळलंच नाही. जास्त करून ‘ताई-ताई’च म्हणतात मला सगळे. सगळ्यांची ताईच झाले मग मी. ताईसारखीच येणार्‍या सगळ्या संघबांधवांची काळजी घेऊ लागले. त्यांचं दुखणं-खुपणं, त्यांची आवड-निवड, सगळं सगळं जपू लागले. रात्री कितीही उशिरा झोपले, तरी पंच पंच उष:काली उठायचा नेम. या शांतवेळी चहा घेताना सुखदु:खाच्या गोष्टी करायच्या. आमच्या टुकीच्या संसारात मिळकत ती काय? पण त्याच वेळी ‘हिशोब लिहायचा’ असा आग्रह यांचा.
 

 
 
मग मुलांच्या चौकशा, इकडचं तिकडचं बोलणं होईस्तोवर जरा फटफटलं की, पर्वतीला जायचं. खरंतर दिवसभर काम करून थोडे का श्रम होतात? मग हे फिरणं कशाला? पुष्कळदा ह्यांना म्हणून पाहिलं, पण ह्यांचं आपलं एकच, ‘‘दिवसभराचं काम- कष्ट म्हणजे नुसती ढोरमेहनत. तो काही व्यायाम थोडाच.’’ म्हणून मग सकाळच्या ताज्या हवेतलं फिरणं चालू ठेवायचंच असा दंडक. खरंतर ह्यांच्या फिरण्याच्या आग्रहामुळे चांगली ठणठणीत होत चाललेय मी अन्‌ त्यामुळेच तर रात्री-अपरात्री पाहुणे येऊन उभे राहिले, तरी त्यांचं आनंदानं स्वागत करायचं, उत्साहानं स्वयंपाक करायचा, त्यांच्या आवडीचं करायचं- खाऊ घालायचं, जाताना भूकलाडू-तहानलाडू बरोबर द्यायचे अन्‌ प्रेमानं निरोप द्यायचा. हा परिपाठ अखंड चाललाय.
 
‘‘चार-सहा मंडळी जेवायला येणार आहेत.’’ दादांच्या (ह्यांच्या) निरोपाप्रमाणे चटपट स्वयंपाक होतच आलाय. गवार तोडून ठेवलीच होती, पण ती जरा कमी वाटली. कोहळ्याच्या फोडी टाकून वाढवा केला. दाण्यांची चटणी आहेच. पण, आज लसणाची चटणी आवडणारे काका यायचेत. त्यांच्याकरता डाळ घालून लसणाची चटणी केली की स्वयंपाक तयार. भाताला वाफ येतीय्‌ तोवर ताटपाणी तयार ठेवावं, म्हणजे एकटीची तारांबळ व्हायला नको. जिन्यावर पायांचा आवाज येतोय्‌. आलीत वाटतं मंडळी. चला, त्यांचं स्वागत करायला हवं. हसर्‍या चेहर्‍यानं, उत्साहानं, आनंदानं, पण... पण हा उत्साह, आनंद, चार-सहाच्या ऐवजी 10-15 लोकांना पाहून कसा टिकवू? खरंतर मी मोठ्या पेचात पडले. स्वयंपाक तर चार-सहा जणांचा अन्‌ आलेत 10-15 जण. खरंतर कधी नव्हेे तो थोडा रागच आला ह्यांचा. आधी सांगायला काय झालं होतं? 10-15 च काय, पन्नास-साठ लोकांचा स्वयंपाक करण्याचं बळ आहे माझ्यात. आता काय करू? भर्रकन बाजरीच्या भाकरी अन्‌ झुणका करावा. ‘बाजरीच्या भाकरी-झुणका’ हा बेत आवडला पाहुण्यांना. त्यांची तृप्ततेची दाद ऐकल्यावर थकवा वाटलाच नाही मग मला. रात्री मात्र खिचडी, पापड अन्‌ आमसुलाचं सार हा साधाच बेत, पण तोही पाहुण्यांना अतीच भावला.
 
जेवणं टाकझोप करता करता 11-11.30 केव्हा वाजलेत कळलंच नाही. मुलं तर केव्हाच झोपलीत. चला आपणही थोडा आराम करावा. दिवसभराच्या कामानं शिणल्यासारखं झालंय्‌. थोडासा डोळा लागतो न लागतो तर कडीचा आवाज खड-खड-खड... ‘‘आज लवकर संपली वाटतं ह्यांची सभा.’’ म्हणत दार उघडतेय्‌ तर? तर दारात पाहुणे एक दोन नव्हेत, तर चांगले सात-आठ. भुकेले दिसले. जेवायचं विचारलं तर उत्तर गुळमुळीत. त्यावरून समजलं. चार वाजता पेण सोडलेलं म्हणजे जेवणं व्हायचीत. पटकन पिठलं-भात-भाकर्‍या करून जेवणं केलीत. एक ते दीडच्या दरम्यान आलेल्या ह्यांच्याजवळ, पाहुण्यांनी मी केलेल्या अगत्याचं कौतुक ऐकून म्हणते झाले, ‘‘गृहस्थाश्रमाचा धर्म पाळतो आम्ही.’’ का कोण जाणे? मला जरा अस्वस्थच वाटायला लागलं. आज एकूण पाहता जरा जास्तच ताण पडला. खरंतर पदार्थ करण्याची, खाऊ घालण्याची भारी आवड. पण... पण आज मात्र त्या आवडीला तडा गेलाय्‌, मन खिन्न झालं, उदासलंय्‌.
 
नेहमीप्रमाणे दिवस उजाडलाय्‌, पण आज मात्र तो उत्साह घेऊन आला नाही. पूर्व दिशा उत्साहात तेजाचं हास्य घेऊन रविराजाचं स्वागत करायला हुरूपलीय. पानं-फुलंपण सळसळून स्वागतात सामील होताहेत. पक्ष्यांंनापण कोण उत्साह... किलबिल, कलकलाट, चिवचिवाट सारखा चालू आहे त्यांचा. अशा उत्साही, आनंदी वातावरणाचा माझ्यावर आज काहीच परिणाम होत नाहीय्‌. अनुत्साहच वाटतोय्‌. रोजची कामं करण्याची घाई, लगबग कराविशी वाटतच नाही. यंत्रवत काम करतेय्‌. रोजचं जीव ओतणं आज नाहीय्‌.
 
मंडीत जाताना नानांची रोजच्या परिपाठाप्रमाणे हाक कानी आली, ‘‘ताई, काय आणू?’’ उत्तर द्यावंसं वाटतच नाही. त्यांचं आपलं बोलणं चालूच. थांबवताही येत नाहीय. ‘‘काय आणू? अगं सध्या बाजारात बुटक्या, कमी तिखटाच्या मिरच्या आल्याहेत. त्यांचं िंलबू पिळून लोणचं करून ठेव. डावीकडे वाढायला होईल तुझ्या घरच्या अन्नछत्रात. डाव्या बाजूला काय वाढू? हा तुझा प्रश्न सुटेल बघ. मग आणू का?’’ माझा रुकार अथवा नकार काहीच न मिळाल्यानं... ‘‘का गं? बोलत का नाहीस?’’ ‘‘आज नकोय्‌ मला काही’’ माझ्या फुरंगटून केलेल्या उत्तरानं जरा गोंधळले. नेहमी मंद मंद स्मिताने स्वागत करणार्‍या तापीला आज झालंय्‌ काय? शंका येऊन काळजीनं विचारते झाले, ‘‘बरं नाही वाटत का तुला ताई? कसं कसं वाटतेय्‌ का? ‘‘कंटाळा आलाय्‌.’’ माझ्या हताश स्वरांनी विचलित होऊन शांतपणे विचारते झाले, ‘‘कसला कंटाळा आला? ‘या... या धबडग्याचा.’’ पटकन शब्द निघून गेले. ‘‘अगं, असा कंटाळा करून कसं चालेल? फार ताण पडला का काल तुला ताई?’’
 
‘‘मग धट्‌टकट्‌टं असलं म्हणून का करतच राहायचं? थकून, भागून, दमून पाठ टेकत नाही तर पाहुणे हजर.’’ ‘‘उठून केलंस न त्यांचं?’’ नानांच्या प्रश्नाच्या, ‘‘केलं हो नाना. उपाशीपोटी थोडीच राहू देणाराय्‌.’’ प्रत्युत्तरावर केव्हढं भाष्य केलं. केवढा मोलाचा सल्ला दिला, ‘‘हे बघ, तुझ्याच्याने जेवढं होईल तेवढच कर. पण जे करशील ते आनंदानं कर. कारण आदळआपट करून श्रीखंड-पुरी जरी केली तरी ती खाणार्‍याला तृप्त करत नाही. उलट प्रेमानं, आपुलकीनं नुसता लोणचं भात जरी वाढला तरी खाणारा समाधान पावतो. अतिथीला तृप्त करण्याचं हे व्रत आहे अन्नपूर्णेचं. चांगुणेनं घेतलेलं. पाहुणा येणारच. मग त्याला हसत का पाठवू नये. आपल्या घरातून ‘रडत पाहुणा’ नाही तर ‘हसत पाहुणा’ जावा.’’ किती सोप्या शब्दांत समजावलं न्‌ नानांनी मला. भारावून गेले, डोळेपण भरून आले माझे अन्‌ एकदमच म्हणून गेले, ‘‘खरं आहे तुमचं नाना. यापुढे असं कधी घडणार नाही. ‘हसत पाहुण्याचं’ व्रत कधी मोडणार नाही, मोडणारच नाही, कधीच नाही...’’