अयोध्या प्रकरण; १५ ऑगस्टपर्यंत मध्यस्थी समितीला मुदतवाढ
   दिनांक :10-May-2019
नवी दिल्ली,
अयोध्या राम जन्मभूमी विवादीत प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. मध्यस्थी समितीचे अध्यक्ष न्या. एफ.एम.आय. खलीफुल्ला यांनी आज झालेल्या सुनावणीमध्ये अहवाल सादर करण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे वेळ वाढवून देण्याची मागणी केली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने येत्या 15 ऑगस्टपर्यंत मध्यस्थी समितीला मुदतवाढ दिली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एस.ए. बोबडे, न्या. डी.वाय. चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. अब्दुल नजीर या पाच न्यायाधीशांचे घटनापीठ सुनावणी घेण्यात आली.
 
 
अयोध्या प्रकरणी 8 मार्च रोजी सुप्रीम कोर्टाने माजी न्यायमूर्ती एफ.एम.आय. खलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय मध्यस्थांची समिती नेमली होती. अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ विधिज्ञ श्रीराम पंचू हे समितीचे सदस्य आहेत. या समितीला ८ आठवड्याच्या आत सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. तसेच कोणतीही माहिती माध्यमांना देऊ नये अशी ताकीददेखील देण्यात आली होती. त्यामुळे आतापर्यंत या अहवालात कोणती माहिती दिली गेली आहे याची कल्पना कोणालाही नाही. आज झालेल्या सुनावणीमध्येही मुख्य सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी मध्यस्थी समितीला गोपनीयता पाळण्याबाबत ताकीद दिली आहे.