धक्कादायक: बेपत्ता चिमुकल्याचा कारमध्ये सापडला मृतदेह

    दिनांक :10-May-2019
 
खळबळजनक घटना मृत्यू गुदमरून होण्याची शक्यता
 
वरुड: शहराच्या पुसला रोडवरील शिक्षक कॉलनी लगतच्या एका शेतातील 7 वर्षीय चिमुकला घराशेजारीच खेळत असताना 5 मे रोजी अचानक बेपत्ता झाला होता. त्याच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन वरुड पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध अपहरण केल्याचा गुन्हा नोंदविला होता. मात्र तब्बल 5 दिवसानंतर त्या चिमुकल्याचा मृतदेह बेवारस कारमध्ये शुक्रवारी दूपारी आढळल्याने एकच खळबळ माजली आहे.
 

 
 
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या पुसला मार्गावर शिक्षक कॉलनी लगतच्या एका शेतात वास्तव्यास असलेल्या ललीता कैलास पंधरे नामक महिलेचा 7 वर्षीय चिमुकला अजय हा 5 मे रोजी सकाळी दहा वाजताचे सुमारास घरा शेजारीच खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता. दरम्यान कुटुंबियांनी सर्व नातेवाईकांकडे अजयची शोधा-शोध करुन सुद्धा अजय सापडला  नाही. अखेर ललीता कैलास पंधरे हिने 7 मे रोजी वरुड पोलिस स्टेशन गाठुन तक्रार दिली. वरुड पोलिसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा नोंदवुन त्या दिशेने तपास आरंभीला होता. मात्र वरुड पोलिसांना सुद्धा अजयचा कुठलाच ठावठिकाणा लागला  नाही. अश्यातच वरुड -पांढुर्णा रस्त्यालगत असलेल्या साईकृपा सर्व्हीसींग सेंटर समोर नालीचे बांधकाम करीत असलेल्या मजुरांना दुर्गंधी आली. त्यांनी सर्व्हीसींग सेंटरच्या परिसरात बेवारस असलेल्या 3 कार जवळ जावुन पाहणी केली. त्यातील सोनेरी रंगाच्या एम.एच.01 व्ही.ए.4349 क्रमांकाच्या कारमध्ये चिमुकल्याचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत त्याना आढळुन आला. या घटनेची माहिती वरुड पोलिसांना मिळताच ठाणेदार दिपक वानखडे यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळ गाठले. फॉरेंसीक लॅबच्या चमुला सुद्धा पाचारण करण्यात आले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर 5 मे रोजी अजय त्या बेवारस कारचे गेट खोलुन कारमध्ये बसायला गेला आणि त्या कारचे गेट पुन्हा त्याच्याकडून उघडले नसेल. त्यातच 44 अंश तपमानामध्ये कारचे सर्वच काच बंद असल्यानेच त्याचा कारमध्येच दुर्दैवी मृत्यु झाला असावा असा संशय व्यक्त केल्या जात आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहे.