मोदी हे 'भारताला तोडणारे प्रमुख': 'टाईम'मध्ये वादग्रस्त कव्हर स्टोरी
   दिनांक :10-May-2019
नवी दिल्ली,
आंतरराष्ट्रीय मासिक 'टाइम'नं पंतप्रधान नरेंद्र मोदींना कव्हर पेजवर स्थान दिलं आहे. मात्र मोदींचा उल्लेख मासिकाकडून 'इंडियाज डिव्हायडर इन चीफ' म्हणजेच 'भारताला तोडणारा प्रमुख' असा करण्यात आला आहे. यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. टाइम मासिकानं आशियाच्या आवृत्तीत लोकसभा निवडणुकीवर विशेष लेख प्रसिद्ध केला आहे. यामधून मोदींच्या पाच वर्षांतील कामाचा आढावा घेण्यात आला आहे. 'देशातली सर्वात मोठी लोकशाही मोदी सरकारला आणखी पाच वर्षे देणार का?' या शीर्षकाखाली टाइमनं हा लेख प्रसिद्ध केला आहे.
 
 
 
 
‘लोकप्रियतेमुळे कोलमडलेली लोकशाही म्हणून भारताचे नाव घेता येईल’ या वाक्याने लेखाची सुरुवात झाली आहे. ‘जगातील सर्वात मोठी लोकशाही मोदी सरकारला आणखीन पाच वर्ष देईल का?’ अशा मथळ्याखाली टाइम मासिकाच्या आशिया अवृत्तीमध्ये कव्हरस्टोरी छापण्यात आली आहे. या लेखामध्ये तुर्की, ब्राझील, ब्रिटन आणि अमेरिकेप्रमाणेच भारतातही लोकशाही मुल्यांपेक्षा एखाद्याची लोकप्रियता अधिक वाढल्याचे दिसत आहे असे लेखकाने म्हटले आहे. ‘लोकप्रियतेमुळे या आधी दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या बहुसंख्याकांच्या भावनांना वाचा फोडण्याचे काम झाले आहे. मात्र त्याच वेळी यामुळे देशातील वातावरण निकोप व उत्साहवर्धक राहिलेले नाही,’ असंही तासीर यांनी या लेखात म्हटले आहे. 
 
मोदींवरील लेखातून भारतीय संस्कृतीवरदेखील भाष्य करण्यात आले आहे. 'भारताच्या कथित उदार संस्कृतीची चर्चा केली जाते. मात्र मोदींचं सत्तेत येणे या संस्कृतीत धार्मिक राष्ट्रवाद, मुस्लिमांविरोधातली भावना आणि जातीय कट्टरता किती मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहे ते दाखवतं,' असं टाईमनं म्हटलं आहे. या लेखात 1984 मधील शिखविरोधी दंगल आणि 2002 मधील गुजरात दंगलीचा उल्लेख आहे. 'काँग्रेस नेतृत्व 1984 च्या दंगलीतल्या आरोपांपासून मुक्त नाही. मात्र तरीही त्यांनी स्वत:ला उन्मादी गर्दीपासून दूर ठेवलं. पण 2002 मध्ये मुख्यमंत्री असताना मोदी शांत बसले. त्यांचं हेच मौन दंगल घडवणाऱ्यांच्या पथ्यावर पडलं,' अशी टीका टाइमनं केली आहे.