अंतिम फेरी गाठण्यासाठी दिल्लीसमोर धोनीचा अडथळा

    दिनांक :10-May-2019
विशाखापट्टणम्,
 
नवे नाव आणि नव्याने संघबांधणी केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. स्पर्धेच्या १२व्या अध्यायात प्रथमच अंतिम फेरी गाठण्यासाठी शुक्रवारी त्यांना बलाढय़ चेन्नई सुपर किंग्जचा अडथळा दूर करावा लागणार आहे.

 
 
‘आयपीएल’ गुणतालिकेत दिल्लीला अव्वल दोन स्थानांपासून रोखण्याची किमया चेन्नईनेच दाखवली. चेपॉकवर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने ८० धावांनी दारुण पराभव केल्यामुळे दिल्लीला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. उभय संघांमधील यंदाच्या हंगामातील पहिला सामनासुद्धा चेन्नईनेच सहा गडी राखून जिंकला आहे. त्यामुळेच ‘क्वालिफायर-२’ सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.
बुधवारी झालेल्या ‘एलिमिनेटर’ सामन्यात दिल्लीने हैदराबादवर रोमहर्षक विजय मिळवला. याच मैदानावर एक सामना खेळण्याचा अनुभव दिल्लीसाठी उपयुक्त ठरेल. परंतु तीन विजेतेपदे आणि चार उपविजेतेपदांचा अनुभव असणाऱ्या चेन्नईने आठव्यांदा अंतिम फेरी गाठण्याचा निर्धार केला आहे. चेन्नईसारखी फिरकीला अनुकूल खेळपट्टी नसल्यामुळे दिल्लीच्या फलंदाजांना दिलासा मिळाला आहे. अन्यथा इम्रान ताहीर आणि हरभजन सिंग यांच्यासारख्या फिरकीवीरांचा सामना करणे आव्हानात्मक ठरले असते.
संघ :
 
चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सुरेश रैना, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, फॅफ डय़ू प्लेसिस, मुरली विजय, रवींद्र जडेजा, ध्रुव शौरी, चैतन्य बिश्नोई, ऋतुराज गायकवाड, ड्वेन ब्राव्हो, कर्ण शर्मा, इम्रान ताहिर, हरभजन सिंग, मिचेल सँटनर, शार्दूल ठाकूर, मोहित शर्मा, के. एम. आसिफ, दीपक चहर, एन. जगदीशन, स्कॉट कुगेलिन.
दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, शिखर धवन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कॉलिन इन्ग्राम, किमो पॉल, अक्षर पटेल, राहुल तेवतिया, अमित मिश्रा, कॅगिसो रबाडा, इशांत शर्मा, हनुमा विहारी, अंकुश बेन्स, जगदीश सुचित, मनजोत कालरा, ख्रिस मॉरिस, शेरफाने रुदरफोर्ड, जलाज सक्सेना, संदीप लामिछाने, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नथ्थू सिंग, बंडारू अयप्पा, कॉलिन मुन्रो.
* सामन्याची वेळ :
 
सायं. ७.३० वा.’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १