...तर भरचौकात फाशी घेईन; गंभीरचे केजरीवालांना तिसरे चॅलेंज
   दिनांक :10-May-2019
नवी दिल्ली,
दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या उमेदवार अतिशी मार्लेना यांच्याविषयी गौतम गंभीर यांनी कथित आक्षेपार्ह पत्रक काढल्याच्या प्रकरणाने आता एक वेगेलच वळण आहे. मार्लेना यांच्याबाबतची आक्षेपार्ह पत्रके वाटल्यावरून टीका होत असताना गंभीरने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिसरे चॅलेंज दिले आहे. यामध्ये त्याने लोकांसमोर स्वत:ला फाशी लावून घेणार असल्याचे सांगितले आहे.

 
 
पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपाने गौतम गंभीरला निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. तर त्याच्या विरोधात आपकडून आतिशी मार्लेना यांना उमेदवारी दिली आहे. आतिशींनी गौतम गंभीरवर गुरुवारी गंभीर आरोप केला आहे.
 
 
मतदासंघातल्या काही ठिकाणी आतिशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रके वाटण्यात आली. यामागे भाजपा आणि गौतम गंभीर असल्याचा आरोप मार्लेना यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये केला. गंभीर एखाद्या सशक्त महिलेविरोधात अशा प्रकारची पत्रके वाटू शकतात. तर ते महिलांना काय सुरक्षा देणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणी आतिशी यांनी दिल्ली महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. 
 
यावर केजरीवाल यांनी आतिशी एवढ्या चांगल्या शिकलेल्या उमेदवार असताना आणि त्यांनी शिक्षणासाठी एवढे चांगले काम केलेले असताना भाजपा आणि त्यांच्या उमेदवार गौतम गंभीर असले कृत्य करेल असे वाटले नव्हते. गंभीरवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यावर गौतम गंभीरने ट्विट करत केजरीवाल यांच्यासारखा घाणेरडा मुख्यमंत्री पाहिला नसल्याचे म्हटले होते. या प्रकरणी त्याने गेल्या काही दिवसांपासून केजरीवाल यांना दोन चॅलेंज दिली होती. यामध्ये उमेदवारी मागे घेण्याचेही म्हटले होते. आज त्याने फासावर लटकण्याचा इशाराच दिला आहे.
आतिशी यांच्याबाबत मी जर असा प्रकार केला हे जर केजरीवाल आणि आपने सिद्ध केल्यास लोकांच्यासमोर स्वत:ला फाशी लावून घेणार असल्याचे ट्विट त्याने केले आहे. तसेच जर केजरीवाल अपयशी ठरले तर त्यांनी राजकारण सोडावे, असे आव्हानही दिले आहे.