मुकेश अंबानी यांनी ब्रिटिश कंपनी घेतली विकत
   दिनांक :10-May-2019
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ब्रिटनमधील खेळण्याची कंपनी हॅमलेज ( Hamleys )ला खरेदी केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने यासाठी तब्बल ६७.९६ मिलियन पौंड म्हणजेच ६२० कोटी रूपये मोजले आहेत.
 
 
 
हॅमलेज २५९ वर्ष जुनी ब्रिटिश कंपनी आहे. गेल्या काही वर्षांपासून नफा मिळवण्यात अपयश येत असल्यामुळे हॅमलेजने आपली मालकी विकायचा निर्णय घेतला. हॅमलेजची मालकी सध्या हाँगकाँगच्या सी बॅनर आंतरराष्ट्रीय होल्डिंग्स या कंपनीकडे आहे. सी बॅनरने २०१५ मध्ये हॅमलेज खरेदी केली होती. ही खरेदी १०० मिलियन पाऊंडला झाली होती. गुरूवारी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि सी बॅनर आंतरराष्ट्रीय होल्डिंग्स यांनी याबाबत करारावर हस्ताक्षर केले आहेत. या करारानुसार ‘हॅमलेज ग्लोबल होल्डिंग्स लिमिटेड’ या कंपनीत १०० टक्के भागीदार करून रिलायन्सने ही कंपनीच अधिग्रहित केली आहे.