भाषणांमुळे मोदींचा घसा बसला
   दिनांक :10-May-2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्रीचा दिवस करीत आहेत. संपूर्ण देशभरात त्यांच्या दिवसाला दोन ते पाच प्रचारसभा होत आहेत. काल गुरुवारी मोदींच्या पाच जाहीर सभा होत्या. इतक्या सभेत आपल्या विशिष्ट शैलीत भाषण केल्याने त्यांचा घसा बसला. सायंकाळी प्रयागराज येथील रॅलीत ते पोहोचले तेव्हा त्यांचा घसा पूर्ण बसला होता. तरीही त्यांनी जनतेला निराश केले नाही आणि २० मिनिटे भाषण केले. एरव्ही ते किमान ४० मिनिटे भाषण करतात. सध्या मोदी दिवसाला दोन राज्यांमध्ये प्रचारसभा घेत आहेत. सहाव्या टप्प्यातल्या मतदानासाठी गुरुवारी त्यांनी उत्तर प्रदेश आणि बंगालमध्ये पाच प्रचार सभेत भाषण केले. पंतप्रधानांच्या अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, २५ डिसेंबर नंतर ते २०० हून अधिक कार्यक्रमांत सहभागी झाले आहे. यात बहुतांश निवडणूक कार्यक्रम होते. लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच पंतप्रधान मोदींनी १०० हून अधिक लोकसभा मतदारसंघात सभा घेतल्या होत्या.