मेळघाटच्या कोहा जंगलात वाघाचा मृत्यू

    दिनांक :10-May-2019
विष प्रयोगाचा दाट संशय
 
धारणी: गुगामल वन्यजीव विभागातील कोहा नावाच्या निर्जन भागातील एका नाल्यात असलेल्या पाण्याच्या डोहात बुडून एका  तरुण वाघाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दूपारी उघडकीस आली. वाघाचा बुडून मृत्यू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत असून व्याघ्र प्रकल्पात घटनेमुळे खळबळ माजलेली आहे.
टी-32 कॉलर आयडी असलेला सात वर्षाचा पट्टेदार वाघ कोहा जवळच्या एका डबक्यात मृत आढळल्याने इतर प्राण्यांविषयी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह आहे. दोन दिवसांपूर्वी चिखलदरा रेंज मधील कोहाच्या जंगलातील एका डबक्यातून वाघाला बाहेर पडता आले नाही, असा खुलासा रेंजर आवारे यांनी केलेला आहे. पाण्यातून वाघाचे शव काढल्यावर मोक्यावरच शव विच्छेदन उरकवण्यात आल्याने अनेक शंका कुशंका वाढलेल्या आहेत. समोर बुद्ध पौर्णिमा असून मेळघाटातील जास्तीत जास्त मचान (टॉवर) बुक झालेले असल्याने या घटनेसोबत जोडून पाहीले जात आहे. एक तरुण वाघ मे महिन्यात पाण्याच्या डबक्यात मरणे आश्चर्यकारक  आहे.
 

 
 
 
माहितीप्रमाणे कोहा भाग निर्जन असला तरी धारणी ते आकोट मार्ग हे दिवसभर आणि सूर्यास्तानंतर सुद्धा चालतच असतो. तीन महिन्यापूर्वी वन्य प्राण्यांची शिंगे सावर्‍या नाक्यावर बस मधून वाहतुक करताना पकडण्यात आलेली होती. टी-32 हा पाण्यात विष अथवा युरीया कालवल्याने पण मरु शकतो, अशी शक्यता नाकारता येत नाही. मृत वाघाच्या शरीरावर कोणतीही जखम नसल्याचे पण सांगण्यात आलेले आहे. म्हणून विषयुक्त पाणी पिण्याची जास्त शक्यता वाटत आहे. तरुण वाघाचा असा मृत्यू अविश्वसनीय तथा असाधारण घटना मानली जाते म्हणून घटनेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी होत आहे.
 
व्याघ्रच्या जंगलातील नैसर्गिक पाण्याच्या डबक्यांमध्ये विष टाकून मासेमारी किंवा वन्य प्राण्यांना मारण्याचे उपक्रम सतत चालू असते. याशिवाय पाळीव प्राणी मेल्यावर त्याच्या शरीरावर विष टाकून पण सुरक्षितपणे शिकार करण्यात येत असते. तरुण वाघ पाण्यात बुडून मेल्याचे स्पष्टीकरण काही तरी लपविण्यासाठी करण्यात आल्याची चर्चा आहे.