कॉंग्रेसचे २० आमदार सरकारवर नाराज : येदियुरप्पा
   दिनांक :11-May-2019
 बंगळुरू: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी कॉंग्रेसचे 20 आमदार सरकारवर नाराज असल्याचे म्हटले आहे. नाराज आमदार कोणत्याही क्षणी आपला निर्णय घेऊ शकतात. हे नाराज आमदार काय भूमिका घेतील, याकडे आमचे लक्ष असल्याचे येदियुरप्पा आज शुक्रवारी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.
मागील वर्षी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीनंतर कॉंग्रेसने कुमारस्वामी यांना पािंठबा देत मुख्यमंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात घातली होती. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक 104, तर कॉंग्रेसला 80 आणि जदयूला 37 जागा मिळाल्या होत्या.
 
 
 
भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी कॉंग्रेसने जदयूला पािंठबा देत, सरकार स्थापन केले होते. त्यापूर्वी राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून सरकार स्थापनेसाठी भाजपाला निमंत्रण दिले होते. परंतु, बहुमताचा आकडा गाठता न आल्याने येदियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला होता.
त्यानंतर भाजपा फोडाफोडीचे राजकारण करून सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आला होता. अनेकदा कॉंग्रेसने भाजपावर सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे आरोपही केले होते.
दरम्यान, आपले सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, अशा विश्वास कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी व्यक्त केला आहे.