शंखाची उत्पत्ती

    दिनांक :11-May-2019
हिंदुस्थानी संस्कृतीमध्ये व हिंदू धर्मामध्ये शंखाची पूजा महत्त्वाची मानले जाते. भगवान विष्णूंनी धारण केलेल्या चार आयुधांमध्ये एक शंख आहे. इतकेच नव्हे तर शंखाची पूजा केल्याखेरीज विष्णूची पूजा केल्यास ती त्यास पोहोचत नाही, अशी मान्यता आहे. शंख ठेवण्याकरिता जे (बहुधा कासवाच्या आकाराचे) आसन असते त्याला अडणी म्हणतात. 
 
 
त्वं पुरा सागरोत्पन्न: विष्णुना विधृते करे।
असत: सर्वदेवानां पांचजन्य नमोस्तुते
 
अशी प्रार्थना करून शंखास पूजेमध्ये मानाचे स्थान दिले जाते.
 
शंखाचे एकूण तीन भाग पडतात. शंखाची पन्हळ, ज्या ठिकाणाहून शंखात घातलेले पाणी पडते ते अग्र आणि ज्यावर वलये असतात ती मागची बाजू. ब्रह्मवैवर्त पुराणात शंखाच्या उत्पत्तीविषयी कथा आहे- शंखासुर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता. या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला. मग देवदेवता, ऋषीमुनींनी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंखासुरास धडा शिकवण्याकरिता सांगितले. भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंखासुराचा ठावठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात शंखासुर म्हणाला की, भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळविले. आपण माझा वध अवश्य करावा; परंतु माझी एक इच्छा अशी की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलाने आपणांस स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही, असा मला वर द्यावा. भगवान विष्णूंनी, ‘तथास्तु’, म्हटले आणि शंखासुराचा वध केला. त्या दिवसापासून विष्णूने हातात शंख धारण करावयास सुरुवात केली.
  
महाभारतकालीन प्रसिद्ध शंखांची नावे : 
•श्रीकृष्ण - पांचजन्य
अर्जुन - देवदत्त
भीम - पौंड्र 
देवदानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून जी रत्ने बाहेर आली त्यामध्ये एक शंख आहे. देवपूजेमध्ये शंखपूजेचे महत्त्व अनन्यसाधारण आहेच. त्याचप्रमाणे पुरातन काळी अनेक प्रकारच्या पुण्यकर्मांच्या वेळी, विवाहप्रसंगी, युद्धाच्या वेळी शंखध्वनी खूप महत्त्वाचा मानला जातो. मंदिरामध्ये शंखध्वनीचे विशेष महत्त्व आहे. तंत्रोक्त विधीमध्ये शंखाद्वारे अभिषेकाचे अलगच महत्त्व आहे. शंखध्वनींमुळे उत्पन्न होणार्‍या कंपनांमुळे सभोवतालचे वातावरण शुद्ध व पवित्र होते. तसेच तो फुंकणार्‍या व्यक्तीची फुप्फुसाची क्षमता वाढून तेज व ओजवृद्धी होते. पुरातन काळापासून शंख हे विजयाचे, सुखसमृद्धीचे प्रतीक मानले जाते.
 
शंख चंद्र-सूर्यासमान देवस्वरूप आहे. त्याच्या मध्यभागी वरुण, पृष्ठभागात ब्रह्मदेव आणि अग्रभागी गंगा व सरस्वतीचे वसतिस्थान आहे. त्रैलोक्यात जेवढी तीर्थे विराजमान आहेत, ती सर्व विष्णूच्या आज्ञेने शंखामध्ये निवास करतात, अशी कल्पना आहे. बंगाली लग्नात शंख वाजवल्याशिवाय लग्नाची सुरुवात होत नाही.
 
शंखाचे प्रकार व जाती
  • शंखाचे मुख्यत: दोन प्रकार असतात. पहिला दक्षिणावर्ती (उजवा) शंख व वामावर्ती (डावा) शंख.
  • ज्या शंखाचा पृष्ठभाग स्वत:कडे करून देवाकडे त्याचे अग्र केले म्हणजे त्याच्या पन्हाळीची पोकळी उजव्या बाजूला येते असा शंख म्हणजे दक्षिणावर्ती (उजवा) शंख. 
  • याविरुद्ध ज्या शंखाच्या पन्हाळीची पोकळी डाव्या बाजूला येते असा शंख म्हणजे वामावर्ती (डावा) शंख.
  • दक्षिणावर्ती शंख दुर्मिळ असल्याने त्याच्या किमती अधिक असतात. शंखाची योग्य ती परीक्षा करूनच तो खरेदी करावा. दक्षिणावर्ती शंखाचे पुन्हा वजन व आकारावरून नर व मादी असे भेद होतात. शंखाच्यादेखील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशा चार जाती आहेत.
  • अथर्ववेदामध्ये सात मंत्रांनी युक्त अशा शंखमणिसूक्तामध्ये दक्षिणावर्ती शंखाची महती वर्णन केली आहे. दक्षिणावर्ती शंख अंतरीक्ष वायू, ज्योतिमंडल आणि सुवर्णाने युक्त आहे. समुद्रमंथनातून निर्माण झालेला हा शंख राक्षसी, वाईट शक्तींचा नाश करणारा आहे.
  • रोगनिवारण करून आरोग्यसंपन्न आयुर्मान देणारा, जीवनाचे रक्षण करणारा तसेच अज्ञान व अलक्ष्मीस दूर करून ज्ञान व अखंड स्थिर लक्ष्मी देणारा आहे. (संकलीत) (क्रमश:)