दिवसाढवळ्या व्यापाराचे अडीच लाख लांबविले

    दिनांक :11-May-2019
शहरात चोरीचे सत्र सुरूच 

 
 
तभा ऑनलाईन  
अचलपुर,
दोन दिवसापूर्वी परतवाडा शहरातील अग्रवाल नामक व्यापाराच्या घरी पडलेल्या दरोड्याची घटना ताजी असतानाच आज शनिवारी अचलपूर शहरातील चावल मंडी या गजबजलेल्या भागात जाबीर किराणा मर्चंटचे संचालक अब्दुल हफिज अब्दुल रशिद हे नेहमी प्रमाणे आपले प्रतिष्ठान उघडत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पिशवीतील अडीच लाख रुपये लांबवले. या घटनेने जुळ्या शहरातील व्यापारी व नागरीकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.
 
अचलपुर चावल मंडी येथील जाबीर किराणाचे संचालक अब्दुल हाफिज अब्दुल रशीद हे शनिवारी दररोजच्या वेळी आपले प्रतिष्ठानचे कुलूप उघडून दुसरे कुलूप उघडायला गेले असताना त्यांनी त्यांच्या हातातली पिशवी खाली ठेवली होती. त्याचवेळी अज्ञात चोरट्याने काही क्षणात अडीच लाख रुपये व इतर किल्ल्या असलेली पिशवी लांबवली. अब्दुल यांनी शेतात कुपनलिका केली होती त्या व्यक्तीचे पैसे देणे करीता त्यांनी घरूनच अडीच लाख पिशवीत आणले होते. दुसरे कुलूप उघडून झाल्यावर पिशवी दिसत नसल्याने त्यांनी आरडाओरडा करून आजूबाजूच्या व्यापाऱ्यांना ही घटना सांगितले. लगेच सर्व व्यापाऱ्यांनी पोलिस स्टेशन गाठत तक्रार दिली. तक्रार देत असताना काही पोलिस कर्मचारी व काही व्यापारी यात शाब्दिक चकमक उडाल्याची माहिती आहे. चावल मंडी पोलिस चौकी समोर हे दुकान असून याठिकाणी नेहमीच पोलिस बंदोबस्त असतो परंतु, घटनेच्या वेळी एकही पोलीस नसल्यामुळे चोरट्यांची हिम्मत वाढून चोरी झाली असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
 
गेल्या एक महिन्यात अचलपूर शहरात दुर्गा पान सेंटर - देवडी ,अग्रवाल हार्डवेअर -देवडी ,गुलाब हॉटेल व अन्य काही ठिकाणी चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. पोलिसांची गस्त कमी पडत असल्यामुळे अशा घटना घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
 
 
 
पोलिस करतात गप्पा
गेल्या काही दिवसापासुन चोरीच्या घटना वाढल्या आहेत. जुळ्या शहरात चोरी, दरोडा पडत असताना पोलिस फिक्स पाईट वर न राहता इतर ठिकाणी गप्पा मारतांना दिसतात. पोलिसांनी गस्त वाढवून अशा घटनांना आळा घालणे गरजेचे आहे.
मनीष खंडेलवाल
अध्यक्ष, व्यापारी असोसिएशन-अचलपूर