अमेरिकेचा चीनला दणका; सर्व आयातीत वस्तूंवर वाढीव कर लागू
   दिनांक :11-May-2019
-जागतिक अर्थव्यवस्था कोलमडणार
वाशिंग्टन,
 
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर चीनला दिलेली धमकी खरी करून दाखवली आहे. चीनच्या सुमारे 200 अब्ज डॉलर्सच्या आयातीत वस्तूंवर 15 टक्के कर आकारण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात यावी, असे आदेश ट्रम्प यांनी आज शनिवारी सर्व विभागांना दिले. यामुळे अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाचा भडका उडणार असून, त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसून येणार आहे.
 
 
चीनच्या आयातीत वस्तूंवर अमेरिका आतापर्यंत 10 टक्के कर आकारत होता, पण आजपासून 25 टक्के कर आकारण्यात येणार आहे, अशी माहिती अमेरिकेचे व्यापार सचिव रॉबर्ट लाईटहिझर यांनी दिली.
 
चीनच्या कोणकोणत्या वस्तूंवर जास्तीत जास्त कर आकारला जाऊ शकतो, त्यांची यादी तयार करण्याची सूचना ट्रम्प यांनी आम्हाला दिलेली आहे आणि आम्ही त्यांच्या आदेशाचे पालन करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
 
आम्ही निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या संदर्भातील जाहीर सूचनाही अधिकृत संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे. त्यावर व्यापार्‍यांची प्रतिक्रिया मागवली जाणार आहे, असे ते म्हणाले.