इम्रान हाश्मीचे स्वप्न झाले पूर्ण
   दिनांक :11-May-2019
इम्रान हाश्मीने अनेक कलाकारांसोबत काम केले असून त्यांच्या सोबत त्याने हिट चित्रपट सुद्धा दिले. आता लवकरच इम्रान हाश्मी बिग बी सोबत दिसणार आहे. त्याची ही इच्छा पूर्ण होणार असून हे दोघे लवकरच आपल्याला मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 
 

 
 
आनंद पंडित यांच्या आगामी चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी एकत्र झळकणार असून ‘चेहरे’ असं या चित्रपटाचं नाव आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. हा चित्रपट २१ फेब्रुवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नुकतंच या चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित असल्याचं सांगण्यात येत आहे.
 
 
चित्रपटाच्या नावाची घोषणा झाल्यानंतर चित्रपट दिग्दर्शकांनी चित्रपटाच्या टीमसोबतचा एक फोटोदेखील शेअर केला आहे. विशेष म्हणजे इम्रान हाश्मीनेदेखील एक फोटो शेअर करत या चित्रपटाची माहिती दिली आहे.
 
 

 
 
दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन रुमी जाफरी करणार आहे. तर निर्मिती आनंद पंडित करत असून चित्रपटाची निर्मिती मोशन पिक्चर्स आणि सरस्वती एन्टरटेन्मेंट यांच्या अंतर्गत करण्यात येणार आहे. या चित्रपटामध्ये बिग बी आणि इम्रान हाश्मीव्यतिरिक्त अन्नू कपूर, रघुवीर यादव हे कलाकारही मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.