श्री संत आप्पाजी महाराज ढुमे (वणी, जि. यवतमाळ)
   दिनांक :11-May-2019
प्रा. शांताराम श्रीधरराव ढुमे
9049678500
वैदर्भीय संत या मालिकेत वणी, जि. यवतमाळ येथील संत श्री आप्पाजी महाराज ढुमे यांचा परिचय या लेखातून देत आहे. महाराजांचे पूर्ण नाव श्रीनिवास ( आप्पाजी) निळकंठराव ढुमे. वडील निळकंठराव हे बहुश्रुत व विद्याव्यासंगी होते. त्यांनी इतिहास, भूगोल, वैद्यक, छंदशास्त्र वगैरे विषयावर अनेक ग्रंथ लिहिले आहेत. त्यातल्या त्यात ‘वणीचा इतिहास’, ‘रसराज’ व ‘श्रीकृष्ण लीलामृत कथासार’ हे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. आप्पाजी महाराजांच्या आईचे नाव सुंदराबाई. त्यादेखील श्रीकृष्णभक्त होत्या. अशा माता-पित्यांचे पोटी इ. स. 1852 रोजी वंदनीय आप्पाजी (श्रीनिवास) महाराजांचा जन्म झाला.
 
वणी येथील वंदनीय श्रीमती राधाबाई देशपांडे यांनी आप्पाजी महाराजांचे ओवीबद्ध चरित्र लिहिले आहे. या ग्रंथाचे नाव ‘श्रीनिवासचरितामृत’ आहे. ज्याप्रमाणे श्री ज्ञानेश्वरांची आळंदी, श्री एकनाथांचे पैठण, श्री तुकारामांचे देहू त्याचप्रमाणे 20 व्या शतकातील सुरुवातीच्या कालखंडातील ‘वणी’ ही नगरी विदर्भातील लोकांना आध्यात्मिक क्षेत्रात प्रामुख्याने भगवद्भक्त श्रीनिवास उर्फ वं. आप्पाजी महाराज ढुमे यांची म्हणून परिचित होती. 

 
 
या नगरीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात महाराजांच्या साधुशील वृत्तीला व तपश्चर्येच्या जीवनाला फार महत्त्वाचे स्थान आहे. श्री गोपालकृष्णाचे निस्सीम भक्त म्हणून त्यांनी जन्मभर उपासना केली. नवविधा भक्तीचे जे विविध प्रकार आहेत ते सर्वच त्यांनी श्रीगुरुकृपेकरून हाताळून सगुण भक्तीचा एक उत्तम आदर्श समाजासमोर ठेवला. ही गुरुकृपा संपादन करण्यासाठी त्यांनी अपरिमित कष्ट वेचले. हे सर्व कष्ट सोसताना त्यांच्यातील दैवी संपत्तीचा उत्तरोत्तर विकास होऊन त्यांच्या निर्मल अंत:करणाची साक्ष त्यांच्या गुरूला पटली आणि शेवटी श्रीसद्गुरूच्या कृपाप्रसादेकरून (श्री रामानंद महाराज) पारमार्थिक जीवनासंबंधी दिव्य दृष्टी प्राप्त करून घेण्याचे श्रेय त्यांनी मिळविले.
 
‘आत्मनो मोक्षार्थ’ हा हेतू जरी त्यांचा प्रधान असला तरी जगद्धितायच, या लोकोपकारी कार्याचे विस्मरण त्यांनी होऊ दिले नाही. त्या दृष्टीने त्यांच्या पारमार्थिक जीवनातून निर्माण होणार्‍या आध्यात्मिक विचारलहरी समाजाप्रती पोहचल्या व विविध तापांनी पोळलेल्या आर्त जिवाला धैर्य व समाधान देण्यात उपयुक्त ठरल्या.
 
आपणांसारिखे करितो तत्काळ। नाही काळ वेळ तयालागी।।
 
या अनुभवाची प्रचीती त्यांच्या अनेक भक्तांना आली. वंदनीय महाराजांनी लोककार्य फार मोठ्या प्रमाणावर केले. भक्तिप्रधान असा जो श्रीमदभागवद् ग्रंथाची पारायणे त्यांनी अखंड केली. श्री मुरलीधराच्या सगुण मूर्तीसमोर रात्री तासन्‌तास उभे राहून सुस्वर, तालबद्ध व मधुर असे परमेश्वराचे भजन करण्याचा त्यांचा नियम अखेरपावेतो अभंग राहिला.
 
श्री देवनाथ, श्री दयाळनाथ आदी संतांनी प्रासादिक वाणीने केलेले आध्यात्मिक मोक्षपदे महाराजांच्या सुरेल व पहाडी आवाजातून ऐकताना सामान्य जीवदेखील क्षणभर देहभान विसरण्याचा आनंदानुभव घेऊ शकत होता.
 
दररोज नित्य भजनदेखील महाराज रात्रौ दोन प्रहरपर्यंत करीत असत. शुक्रवार व एकादशी या दिवशी तर रात्री अंथरुणाला त्यांची पाठही टेकत नसे. भजनाची आरती झाल्याबरोबर लगेच प्रात:स्मरण व प्रात:स्नान याच्या तयारीला ते लागत असत. रात्री 10 च्या सुमारास एकदा ‘नारायण हरी। जय जय रामकृष्ण हरी।’ असा हरिनामाचा गजर करून भजनास उभ्याने सुरुवात झाली की, आरती, प्रसादपावेतो भगवंताच्या गुणवर्णनाशिवाय इतर कोणत्याही कार्यक्रमाला त्यांच्या भजनात स्थान नव्हते.
नित्य व नैमित्तिक भजन, भागवतसप्ताह, भजनसप्ताह, धुळदशमी (पाटाळा येथील वर्धा नदी काठावरील यात्रा (वणी-वरोरा मध्ये) वं. आप्पाजी महाराजांनी सुरू केली होती. आजही वरील यात्रा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ‘गोपालकाला’ इत्यादी उपासनाप्रधान सामुदायिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी जो लोकसंग्रह केला त्यावरून त्यांची समाजकल्याणासंबंधी तळमळ अहर्निश दिसून येत होती.
 
‘जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले।।’ हे साधुत्वाचे लक्षण त्यांच्या ठिकाणी असल्यामुळे त्यांच्यातील देवत्वाची जाणीव त्यांच्या अनेक भक्तांना झाली असल्यास नवल नाही.
 
धन्य पुरुषांचे जे वर्णन समर्थांनी केले आहे, ते वंदनीय आप्पाजी महाराजांच्या जीवनाला यथार्थतेने लागू पडते.
 
सदा देवकाजी झिजे देहू ज्याचा।
सदा रामनाचे वदे नित्य वाचा।
स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा।।
सदा बोलण्यासारिखे चालता हे।
अनेकी सदा एक देवासि पाहे।
सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा।।
 
अशाप्रकारचे कृतार्थ आयुष्य घालवून प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड बांधणारा इष्ट असा आदर्श या सत्पुरुषाने जगापुढे ठेवला.
शके अठराशे त्रिपंचाशतम। हेमंत ऋतू मार्गशीर्ष जाण।
(सन 1931) शुद्ध षष्ठी दिन उगवला।। असा ढुमे कुळीचा कुलदीपक। भक्ताग्रणी संत नायक। भाली लेवोनि परमार्थ तिलक। वैकुंठासी पै गेला।