कीर्तनभक्ती

    दिनांक :11-May-2019
वृषाली विनयराव मानेकर
9527597412
या जगात निर्माण होणारी प्रत्येक वस्तू नाशिवंत आहे, परंतु परमात्मा मात्र अविनाशी आणि आनंदरूप आहे. विशेष म्हणजे त्याला इतरत्र कुठे शोधण्याची गरज नाही. आपल्या अंतरस्थ हृदयात त्याचे कायम वास्तव्य आहे. हृदयात वास्तव्यात असलेल्या त्या आनंदरूप ईश्वराकडे आपले लक्ष जात नाही; परंतु या दुःखदायी प्रपंचाकडे मात्र आपला सतत ओढा असतो. त्याचे आकर्षण असते. जेव्हा जीव संसाराकडे पाठ फिरवतो आणि भगवंताची त्याला ओढ लागते तेव्हा खरे म्हणजे भक्तीचा जन्म होतो. विवेकवैराग्य असेल तर ज्ञानाची वृद्धी होते. तो आहे आणि मी त्याचा आहे, हा भाव भक्ती निर्माण करतो. भगवंताच्या आड येणारे दोष हळूहळू लोप पावतात आणि जीव पवित्र, शुद्ध होतो. मी त्याचा आहे, हा भाव कोणत्या जिवात केव्हा व कसा उत्पन्न होईल, हे सांगता यायचे नाही. कुणात श्रवणाने, कुणात कीर्तनाने, कुणात नामस्मरणाने, पादसेवनाने, किंवा अर्चनाने तो भाव उदय पावतो. 
 
 
श्रवणाने वैचारिक बैठक पक्की होते, तेव्हा स्वस्थ बसवत नाही म्हणून श्रवणानंतर कीर्तन आलेच. भगवंताचे गुणगान केल्याने श्रोता-वक्ता दोघेही आनंद अनुभवतात. ज्याला भगवत्‌गुणगायनाला वाहून घ्यावेसे वाटते त्याने वाणीला वळण द्यावे, उत्तम पाठांतर करावे, कीर्तनाची मनापासून आवड असावी. भगवंताला कीर्तन आवडते. भक्तांना संतोष होईल असे भगवंताचे वर्णन करावे. त्यात गोष्टी, विनोद, चुटके, गाणे, प्रतिपादन सगळे विशिष्ट प्रमाणात असावे आणि मूळ कथासूत्राला धरून असावे. कलियुगामध्ये कीर्तनाने समाजाचा उद्धार, प्रबोधन करण्याचा मार्ग सापडतो. कथा सांगताना कथानकाची सुसंगती असावी. टाळ, मृदंग, गायन, नृत्य यांसह भगवंताचे कीर्तन करावे. श्री समर्थ म्हणतात, कीर्तनकार हा समाजाचा अध्यात्मविद्येतील नेता असतो. तो स्वतः अनुभवी वक्ता असावा. नीती, न्याय, वैराग्य, भक्ती व ज्ञान यांचे पोषण होईल असेच त्याने सांगत राहावे.
 
सन्मार्गाचा प्रसार करणे, हेच कीर्तनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. साधनमार्ग कसा असतो, परमात्मस्वरूप कसे आहे, याचा ऊहापोह प्रामुख्याने कीर्तनात यावा. कीर्तन म्हणजे मनोरंजन नव्हे किंवा बाष्कळ विनोद सांगण्याचे, चित्र-विचित्र अंगविक्षेष करण्याचे ते व्यासपीठ नव्हे. वेदांचा अभ्यास, पुराणांचा उल्लेख, माया, ब्रह्माचे स्वरूप सर्व अंगांनी स्पष्ट करून सांगावे. ज्या बोलण्याने शंका-कुशंका उत्पन्न होतील, समाधान बिघडेल, न्यायनीतीचे उल्लंघन होईल, साधन सुटेल असे काहीसुद्धा कीर्तनात बोलू नये. भगवंताच्या सगुण चरित्रकथेला कीर्तन असे म्हणतात. अद्वैताचे विवेचन आणि प्रतिपादन करणे म्हणजेच निरूपण होय. सगुणाचे महत्त्व सांभाळावे आणि निर्गुणाचे प्रतिपादन करावे. वक्ता अनुभवसंपन्न असावा. म्हणजे उत्तम सन्मार्ग सापडेल असे ज्ञान तो देऊ शकतो. कीर्तनाच्या माध्यमातून उत्तम सामाजिक प्रबोधन करू शकतो. कीर्तन करण्याने व ऐकण्याने पापाचा नाश होतो. कीर्तनाने उत्तम गती प्राप्त होते. भगवंताशी एकरूपता साधता येते. कीर्तनाने वाणी पवित्र होते.
 
कीर्तनाने माणूस भगवंताला योग्य होतो, इतकेच नाही, तर तो शीलवान, चारित्र्यवान बनतो. कीर्तनाने एकाग्रता साधते. नारदमुनी- ब्रह्मदेवाचे पुत्र- निरंतर भगवंताचे कीर्तन करतात म्हणूनच त्यांची ओळख ‘नारायण’ अशी आहे. कीर्तनाची गादी म्हणजे नारदांची गादी, असे संबोधले जाते. भगवंताच्या कीर्तनात समस्त तीर्थे एकवटली असतात. तत्कालीन समाजात प्रचार-प्रसार-प्रबोधनाची कोणतीच साधनं नव्हती, त्या काळात श्री समर्थांनी, तुकोबारायांनी, मोठमोठ्या थोर संतांनी कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागरणाचे अलौकिक कार्य केले आहे. श्री समर्थ म्हणतात, कीर्तनात प्रत्यक्ष जगदात्मा सूक्ष्म रूपाने उपस्थित असतो. 
सदा सर्वदा हरी कीर्तन।
ब्रह्मसुत करी आपण।
तेणे नारदतोचि नारायेण।
म्हणोनि कीर्तनाचा अगाध महिमा।
कीर्तने संतोषे परमात्मा।।
(क्रमशः)
।।जयजय रघवीर समर्थ।।