सुआरेझ अंतिम फेरीला मुकणार

    दिनांक :11-May-2019
बार्सिलोनाचा अव्वल फुटबॉलपटू लुइस सुआरेझच्या गुडघ्याच्या दुखापतीवर गुरुवारी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे या महिन्याअखेरीस व्हॅलेंसियाविरुद्ध होणाऱ्या कोपा डेल रे चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत तो खेळू शकणार नाही.
 


लिव्हरपूलकडून बार्सिलोनाला ४-० असा धक्कादायक पराभव पत्करावा लागलेल्या चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात तो ९० मिनिटे खेळला होता. कोपा डेल रे चषकाचा अंतिम सामना २५ मे रोजी होणार असला तरी बार्सिलोना क्लबने त्याच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यावर भर दिला. त्यामुळे तो पुढील चार ते सहा आठवडे खेळू शकणार नाही, असे बार्सिलोनाने स्पष्ट केले आहे. पुढील महिन्यात ब्राझीलमध्ये रंगणाऱ्या कोपा अमेरिका स्पर्धेतही त्याच्या समावेशाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या स्पर्धेत सुआरेझच्या उरुग्वे संघाचा पहिला सामना १६ जून रोजी इक्वेडोरशी होणार आहे.
‘‘लुइस सुआरेझच्या उजव्या पायाच्या गुडघ्याला वेदना होत आहेत. त्यामुळे त्यावर लवकरात लवकर शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. त्याला दुखापतीतून पूर्णपणे बरा होण्यासाठी तीन ते चार आठवडय़ांचा कालावधी लागेल,’’ असे बार्सिलोनाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.