‘अपाची’ हेलिकॉप्टर हवाई दलाच्या ताफ्यात दाखल
   दिनांक :11-May-2019
भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात ‘अपाची’ हे अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर दाखल झाले आहे. अमेरिकेतील अॅरीझोना येथील उत्पादन तळावर भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडे अपाची हेलिकॉप्टर सुपूर्द करण्यात आले. भारताने अमेरिकेबरोबर २२ अपाची हेलिकॉप्टर खरेदीचा करार केला आहे. मागच्या वर्षी ट्रम्प प्रशासनाने भारताला अपाची हेलिकॉप्टर विक्रीच्या व्यवहाराला मंजुरी दिली.
 
 
अॅरीझोनामध्ये अपाची हेलिकॉप्टरचे उत्पादन केंद्र आहे. अपाची हेलिकॉप्टरची जगातील सर्वोत्तम लढाऊ हेलिकॉप्टर्समध्ये गणना होते. या हेलिकॉप्टरमुळे भारतीय हवाई दलाची क्षमता कैकपटीने वाढणार आहे. हवाई दलाच्या पठाणकोट तसेच आसामच्या जोरहाटमध्ये या हेलिकॉप्टर्सचा तळ असेल.
 
 
२२ पैकी अकरा अपाची अत्याधुनिक एएनय/एपीजी-७८ लाँगबो फायर कंट्रोल रडार सिस्टिमने सुसज्ज असतील. ठराविक अंतरावरुन लक्ष्यावर अचूक प्रहार करण्याची तसेच शत्रूच्या प्रदेशात जमिनीवरुन धोका असतानाही लढण्याची क्षमता या हेलिकॉप्टरमध्ये आहे. अपाची दीर्घकाळापासून सेवेत असलेल्या एमआय-३५ ची जागा घेतील. अपाची क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेले हेलिकॉप्टर आहे.