पाकिस्तानात महागाई वाढली; नागरिकांनी खंबीर राहण्याचे आवाहन
   दिनांक :11-May-2019
पाकिस्तानी जनता देशात वाढलेल्या महागाईचा सामना करत असल्याची कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली. पाकिस्तानची अर्थव्यवस्था कर्जाच्या बोजाखाली सापडली असून ती सावरेपर्यंत नागरिकांनी खंबीर राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. रावळपिंडीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
 

 
देशात वीजचे, गॅसचे दर वाढत आहेत. देशात महागाई वाढत आहे, याची आपल्याला कल्पना आहे. अशा परिस्थितीत जनतेने आपल्याला सहकार्य करावे, असे आवाहन इम्रान खान यांनी केले. तसेच या कठिण परिस्थितीतून देश हऴूहळू बाहेर पडण्यात यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
2018-19 या कालावाधीत पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर हा 3.3 टक्के झाला. त्यापूर्वी तो 6.2 टक्के इतका होता. तसेच इम्रान खान यांच्या कार्यकाळातील पहिल्या वर्षात सर्वच प्रमुख क्षेत्रांचे प्रदर्शन निराशाजनक राहिल्याची माहितीही काही स्थानिक माध्यमांकडून देण्यात आली. देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पाकिस्तानने आयएमएफकडे मदत मगितली आहे. याच कालावधीत पाकिस्तानच्या आर्थिक वृद्धी दराच्या आकडेवारीचा अहवालही सादर करण्यात आला.
सरकारला कृषी क्षेत्रात 3.8, उद्योग क्षेत्रात 7.6, आणि सेवा क्षेत्रात 6.5 टक्के वृद्धीची अपेक्षा होती. त्याच आधारावर 6.2 टक्क्यांचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, कृषी क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली नसून या क्षेत्राचा वृद्धी दर हा केवळ 0.85 टक्के, तर उद्योग क्षेत्राचा आमि सेवा क्षेत्राचा वृद्धी दर अनुक्रमे 1.4 आणि 4.7 टक्के राहिल्याचेही यात नमूद करण्यात आले.