‘फेसबुक’ बंद करायले हवे : ख्रिस ह्यु
   दिनांक :11-May-2019
न्यूयॉर्क,
लोकप्रिय सोशल नेटवर्क ‘फेसबुक’ आता बंद करायले हवे, अशी भावना माजी सहसंस्थापक ख्रिस ह्यु यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, ख्रिस फेसबुकचे माजी सहसंस्थापक आहेत. त्यांनी मार्क झुकरबर्ग यांच्या साथीने २००४मध्ये फेसबुक सुरू केले होते. त्या वेळी ते दोघे हॉर्वर्ड विद्यापीठात शिकत होते आणि एका छोट्या खोलीत या ‘ऑनलाइन नेटवर्क’ची सुरुवात तेव्हा त्यांनी केली होती.
 
 
 
एकीचे वृत्तपत्राच्या लेखाच्या माध्यमातून ख्रिस यांनी आपली मते व्यक्त केली आहेत. या लेखात त्यांनी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्यावर टीका केली आहे. ‘केवळ वाढ आणि विस्तारावर लक्ष केंद्रित केल्याने झुकरबर्ग यांना सुरक्षा आणि सभ्यतेशी तडजोड करावी लागत आहे,’ असे त्यांनी म्हटले असून, झुकरबर्गचा वाढता आंतरराष्ट्रीय प्रभाव धोक्याची घंटा ठरू नये, असा इशाराही दिला आहे. ‘झुकरबर्ग केवळ फेसबुकच नव्हे; तर ‘व्हॉट्स अॅप’आणि ‘इन्स्टाग्राम’देखील नियंत्रित करीत आहेत. त्यामुळे फेसबुकचे सल्लागार मंडळ आपले काम सोडून केवळ आपल्या प्रमुखाची कार्यक्षमता पाहात बसले आहे,’ असा उपरोधिक टोलाही ख्रिस यांनी लगावला. ख्रिस यांनी ‘फेसबुक’ सोडून दहा वर्षांहून अधिक काळ झाला आहे.
 
‘झुकरबर्ग यांचा एकछत्री अंमल ही फेसबुकची सर्वांत मोठी त्रुटी आहे. त्यांच्या क्षमतेचे नियोजन करण्यासाठी आणि दोन अब्ज लोकांच्या संवादाचे परीक्षण करण्यासाठी तेथे अध्यक्षाच्या दर्जाची एकही व्यक्ती नाही,’ असेही त्यांनी सांगितले. फेसबुक बंद करण्याचा प्रस्ताव मांडण्याची भाषा करणाऱ्या अमेरिकेतील राजकीय नेत्यांच्या विधानालाही ख्रिस यांनी पाठिंबा दिला आहे.