लग्न जुळत नाही म्हणून तरुणाने केली इच्छा मरणाची मागणी
   दिनांक :11-May-2019
पुण्यातील एका तरुणाने चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. आई-वडिलांची देखभाल करणारी जोडीदार मिळत नसल्यामुळे तरुणाने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून इच्‍छामरणाची मागणी केली. यानंतर या तरुणाच्‍या पत्राची मुख्यमंत्र्यांकडून दखल घेण्‍यात आली व त्‍याचे मन वळवण्‍याचा पोलिसांचा आदेश दिला. नैराश्येच्‍या गर्तेत सापडलेल्‍या या तरुणाला त्‍यातून बाहेर काढण्‍यासाठी पुणे पोलिसांना यश आले.
 

 
पुण्‍यातील दत्तवाडी परिसरात राहणार्‍या ३२ वर्षाचा या तरुणास चांगली नोकरी, चांगल्‍या परिसरात स्‍वत:चे घर असतानाही लग्‍नास मुलगी कुण देत नसल्‍याने परस्‍थिती बिकट झाली. त्‍यामुळे आपल्या आजारी असणाऱ्या आई-वडिलांची देखभाल करणारी जोडीदार आपल्याला मिळावा अशी त्‍याची अपेक्षा आहे. याच कारणास्‍तव येणाऱ्या प्रत्‍येक स्‍थळाकडून त्‍याला नकार मिळत होता. यामुळे या तरुणाला नैराश्‍येने ग्रासले होते. याच कारणास्‍तव या तरुणाने मुख्‍यमंत्र्यांकडे पत्र लिहिले व इच्छामरणाची परवानगी मागितली. मुख्यमंत्र्यांकडून या तरुणाच्‍या पत्राची दखल घेतली व एका तरुणाला नैराश्‍यातून बाहेर काढण्‍यास मदत झाली.
या प्रकरणात महत्‍त्‍वाची भूमिका निभावली ती पुणे पोलिसांनी. मुख्यमंत्र्यांनी या पत्राची दखल घेत या तरुणाचे मन वळवण्यासाठी पुणे पोलिसांना आदेश दिले. दत्तवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास घेवारे यांनी या तरुणाला शोधून त्याची भेट घेतली, त्याची समजूत काढली. यावेळी पोलिसांमधील माणूस समोर आला. या तरुणाला चांगली नोकरी आहे. त्याच्या आईला पार्किन्सन्सचा आजार असून वडील ८५ वर्षांचे झाले आहेत.