‘त्या’ लेखाचा लेखक पाकिस्तानी, मोदीद्वेष दिसणारच
   दिनांक :11-May-2019
-भाजपाची रोखठोक भूमिका
 
नवी दिल्ली, 
 
‘टाईम’ मासिकाच्या आगामी अंकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘भारताचा दुफळी निर्माण करणारा नेता’ या शीर्षकाखाली वादग‘स्त लेख प्रकाशित करण्यात आला आहे. या लेखाचा लेखक हा पाकिस्तानी असल्याने, त्याच्या मनात मोदीद्वेष राहणे आणि त्याचे प्रतिबिंब त्याच्या लेखात दिसणे स्वाभाविकच आहे, अशी रोखठोक भूमिका भाजपाने आज शनिवारी व्यक्त केली.
 

 
 
भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत बोलताना भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी, टाईममधील या लेखावर आणि त्याच्या लेखकावर जोरदार हल्ला चढविला. लेखाचा लेखक केवळ जन्मानेच नाही, तर विचारांनीही पाकिस्तानी आहे आणि पाकिस्तानी मानसिकतेच्या लोकांकडून मोदींविषयी कोणतीही चांगली अपेक्षा करता येणार नाही. यावेळी पात्रा यांनी, हा लेख आपल्या टि्‌वटरवर टाकणारे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही सडकून प्रहार केला.
 
2014 मध्येही अनेक विदेश मासिकांनी त्यांच्या लेखांमधून मोदीद्वेष व्यक्त केला होता. आमच्यासाठी ही बाब नवीन नाही. ज्यांना शत्रूंच्या लेखांवर विश्वास आहे, त्यांनी खुशाल तसे करावे. देशवासीयांचा मोदींवर संपूर्ण विश्वास आहे आणि आगामी सरकारही मोदींचेच हवे, असे जनतेला मनापासून वाटते. हीच बाब आमच्यासाठी महत्त्वाची आहे, असे संबित पात्रा यांनी स्पष्ट केले.
 
मोदी सरकारच्या कामगिरी, सुधारणा आणि परिवर्तन या धोरणांतर्गत देशाची वाटचाल अतिशय गतीने प्रगतिपथावर सुरू आहे. आजवर अनेक वर्षांत जे झाले नाही, ते मोदी सरकारने अवघ्या पाच वर्षात करून दाखविले आहे, असा दावाही पात्रा यांनी केला.
 
सिद्धूंचाही घेतला समाचार
 
यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते नवज्योतिंसग सिद्धू यांच्यावरही जोरदार हल्ला चढविला. ते मोदी यांच्यावर पातळी सोडून टीका करीत असतात, पण शिखांचा संहार करणार्‍या काँग्रेस नेत्यांवर आणि या संहाराचे समर्थन करणारे सॅम पित्रोदा यांच्याबाबत एकही शब्दही बोलणार नाही, अशी टीका पात्रा यांनी केली.