मुंबईत रॉबर्ट वढेरांसमोर ‘मोदी मोदी’च्या घोषणा
   दिनांक :11-May-2019
 मुंबई: कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा आज मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवीच्या दर्शनासाठी आले असता मंदिराच्या आवारात काही लोकांनी त्यांच्यासमोर मोदी-मोदी अशा घोषणा दिल्या.
रॉबर्ट वढेरा आज काही कामानिमित्त शहरात आले होते. यावेळी त्यांनी मुंबादेवीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर परत जात असताना काही लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने घोषणा दिल्या. यावेळी उपस्थित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता त्यांनी, आम्ही भाजपाचे लोक आहोत. स्वतःहून घोषणा दिल्या आहेत. आम्हाला कुणीही घोषणा देण्यास सांगितले नव्हते, असे सांगितले.
 
 
 
माध्यमांनी रॉबर्ट यांच्याशीदेखील संवाद साधला. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानावरून देशभरात तापलेल्या वातावरणाबाबत माध्यमांनी विचारणा केली. त्यावर वढेरा म्हणाले की, मी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी आलो आहे. दर्शनदेखील व्यवस्थित पार पडले. यावेळी राजकारणावर काहीही बोलणार नाही.