मोदीजी हे नवविवाहितेसारखे : नवज्योत सिंग सिद्धू
   दिनांक :11-May-2019
नवज्योत सिंग सिद्धू हे शनिवारी मध्य प्रदेशमधील इंदूर येथे होते. पत्रकारांशी बोलताना सिद्धू यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.  नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना नवविवाहितेशी केल्याने वाद निर्माण झाला आहे. “मोदीजी हे नवविवाहितेसारखे आहेत. जी फक्त बांगड्यांचा आवाज करते आणि त्यामुळे गल्लीतील बाकीच्या लोकांना वाटते की ती खूप काम करतेय. गेल्या पाच वर्षांपासून मोदी सरकारच्या काळातही हेच सुरू आहे”, असे विधान सिद्धू यांनी केले आहे.
 
मोदी हे खोटं बोलणाऱ्यांचे प्रमुख आहेत, ते भारताचे विभाजन प्रमुख आहेत आणि इतकंच नव्हे ते अंबानी आणि अदानी यांच्यासारख्या उद्योगपतींचे व्यवसाय व्यवस्थापकही आहेत, अशी टीका त्यांनी केली.
 
 
दरम्यान, शुक्रवारी इंदूरमधील प्रचारसभेत सिद्धू यांनी मोदींवर टीका केली होती. भाजपा म्हणजे ‘काळे इंग्रज’ असून त्यांना सत्तेबाहेर घालवण्यासाठी देश वाचवण्यासाठी मतदान करा, काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. हा मौलाना आझाद आणि महात्मा गांधी यांचा पक्ष आहे. त्यांनी गोऱ्यांपासून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले होते. इंदूरवासियांनो तुम्ही काळया इंग्रजांपासून देशाला मुक्ती मिळवून देणार आहात, असे सिद्धू यांनी म्हटले आहे.