‘लग्नकल्लोळ’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
   दिनांक :11-May-2019
लग्न म्हणजे देवाने घातलेलं सुंदर कोडं आहे. दिसायला कितीही सोपं असलं तरी प्रत्यक्षात मात्र जेवढं सोडवायला जाऊ तेवढं ते गुंतत जातो. लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण. लग्नानंतर नव्याचे नऊ दिवस संपले की, सुरुवात होते ती खऱ्या आयुष्याला. सामान्य माणसापासून ते नावाजलेल्या व्यक्तीपर्यंत सर्वच लोक या अनुभवातून जातात. याच संकल्पनेवर आधारित ‘लग्नकल्लोळ’ हा धमाल विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
 
 
मोहम्मद बर्मावाला दिग्दर्शित ‘लग्नकल्लोळ’ या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान, मयुरी देशमुख ही कलाकार मंडळी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. नावावरूनच हा चित्रपट लग्न या विषयावर आधारित असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. या चित्रपटातून लग्न हा विषय एका आगळ्यावेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकत्याच झालेल्या मुहूर्त सोहळ्यामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक अब्बास-मस्तान यांनी या चित्रपटाची घोषणा केली. तर विनोदाचा बादशहा जॉनी लिवर यांनी या चित्रपटाला पहिली क्लॅप दिला. यावेळी अब्बास मस्तान यांनी या चित्रपटाला भरभरुन शुभेच्छादेखील दिल्या.
“सुदृढ आरोग्यासाठी हसणं हे एक उत्तम औषध आहे. त्यामुळे कायम आनंदी रहा, हसत रहा. विशेष म्हणजे तुम्हाला कायम हसवत ठेवण्यासाठी ‘लग्नकल्लोळ’ हा विनोदी चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे”, असं अब्बास मस्तान म्हणाले.