अकोलीत 'पाणी अडवा पाणी जिरवा' अभियानाला उत्फुर्त प्रतिसाद
   दिनांक :11-May-2019
अकोलीतल्या महाश्रमदानात शेकडोंचा सहभाग
 
अमरावती : खालावलेली जलपातळी व त्यातून निर्माण झालेल्या पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या अमरावतीकरांना भविष्यात पाणी मिळावे. पावसाच्या माध्यमातून उपलब्ध होणारे पाणी वाया न जाता जमिनीत झिरपावे, या उद्देशाने शनिवारी सकाळी अकोली भागातल्या नवीन अमरावती रेल्वे स्थानक परिसरात शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन महाश्रमदान केले.
भाजपाचे नेते व साईनगर-अकोली प्रभागाचे नगरसेवक तुषार भारतीय व त्यांच्या मित्र मंडळाने 'पाणी अडवा पाणी जिरवा' हे अभियान हाती घेऊन जनतेला त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शनिवारी सकाळी ६ वाजल्यापासून नवीन अमरावती रेल्वे स्थानक परिसरात महाश्रमदानाद्वारे शेकडो नागरिकांनी चर खोदले. ९ वाजेपर्यंत सुमारे १०० चर खोदण्यात आले. तसेच रविवारीसुद्धा या परिसरात सकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान महाश्रमदानातून आणखी चर खोदण्यात येणार आहेत. या उपक्रमात लहान मुलांसह युवक, युवती, पुरुष, महिला आणि ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने
 
 
 
सहभागी झाले होते. विविध सामाजिक संघटनाही या उपक्रमासाठी पुढे सरसावल्या आहेत.
अमरावती शहरवासीयांची तहान अप्पर वर्धा धरणात उरलेल्या अल्पशा पाणी साठ्यावर भागवली जात आहे. शहरातील वडाळी आणि छत्री तलाव हे कधी नव्हे ते कोरडे पडले आहेत. अनेक भागातल्या बोअरवेल आटल्या आहे. यापूर्वी अमरावती शहाराने पाण्याची इतकी भीषण टंचाई कधीही पहिलेली नाही. जमिनीत पाणी मुरत नसल्याने अशी गंभीर परिस्थिती ओढावली आहे. निर्माण झालेल्या या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले आहे. दोन दिवसांच्या या श्रमदानानंतर शहरातील खुल्या भूखंडावरही असे चर खोदून जमिनीत पाणी मुरवण्याचा उपक्रम सातत्याने राबविला जाईल, असे नगरसेवक तुषार भारतीय यांनी सांगितले.