पणजी पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रंगत वाढली
   दिनांक :11-May-2019
 पणजी: गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या पणजी मतदारसंघाची विधानसभा पोटनिवडणूक अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपली असून या पोटनिवडणुकीत आता रंग भरू लागला आहे. घरोघरी गाठीभेटींसाठी उमेदवारांची धावपळ चालली आहे. तर दुसरीकडे आरोप-प्रत्यारोप, एकमेकांविरुद्ध तक्रारीही केल्या जात आहेत.
येत्या 19 मे रोजी ही पोटनिवडणूक होत आहे. प्रचारासाठी जवळपास आठवड्याभराचा कालावधी शिल्लक राहिल्याने उमेदवारांची धावपळ उडाली आहे. भाजपा उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर सायंकाळी उशिरापर्यंत प्रचारकार्यात दिसत आहेत, तर सकाळी 9 नंतर प्रचारकामाला सुरुवात करणारे कॉंग्रेसी उमेदवार बाबुश मोन्सेरात आता दोन तास आधीच बाहेर पडू लागले आहेत. गोसुमंचे सुभाष वेिंलगकर, आपचे वाल्मीकि नायक यांनीही प्रचाराची गती वाढवली आहे.
भाजपाने पर्रीकर यांच्या जागी माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना रिंगणात उतरवले आहे. पर्रीकर यांच्या पश्चात भाजपा आणि कॉंग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून संपूर्ण गोव्याचेच नव्हे तर देशाचेही लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. पर्रीकरांची पुण्याई भाजपाच्या कामी येते की यावेळी कॉंग्रेस बाजी मारतो, हे पाहावे लागणार आहे.
कॉंग्रेसचे उमेदवार बाबुश मोन्सेरात यांनी स्वत:च्या गुन्हेगारी पृष्ठभूमीबाबत वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देण्याचे टाळल्याप्रकरणी भाजपाने गुरुवारी मुख्य निवडणूक अधिकार्‍यांकडे तक्रार केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे हे बंधनकारक असून या प्रकरणात अवमान याचिका सादर करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
 

 
 
 
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांना सादर केलेल्या या तक्रारीत असे म्हटले आहे की, मोन्सेरात व कॉंग्रेसने निवडणूक आयोगाच्या या सक्तीच्या तरतुदीचा भंग केलेला आहे आणि तो न्यायालयाचाही अवमान ठरतो. आयोगाने उमेदवाराला याबाबत स्पष्ट आदेश द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. तेंडुलकर यांनी हेही निदर्शनास आणले आहे की, बाबुश यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याविरुद्ध भादंविच्या विविध कलमांखाली तसेच, पोक्सोे, आयकर कायदा तसेच सार्वजनिक मालमत्ता हानी प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हे दाखल असल्याचे स्पष्टपणे म्हटलेले आहे.
दरम्यान, पक्षाचे सरचिटणीस सदानंद तानावडे म्हणाले की, कुणाल यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतलेले असून उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांना कारवाईचे आदेश दिले जातील, असे आश्वासन दिलेले आहे. दरम्यान, भाजपा उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी, या प्रकरणात प्रसंगी अवमान याचिकाही सादर करू, असा इशारा दिला आहे.
दुसरीकडे कॉंग्रेस प्रवक्ते सिद्धनाथ बुयांव यांनी, भाजपाचे माजी आमदार दामू नाईक यांनी बाबुश यांच्यावर जे आरोप केले आहेत त्याचा समाचार घेताना, पर्रीकर पणजीत निवडणूक लढवायचे तेव्हा भाजपा बाबुशचा पािंठबा कोणत्या तोंडाने घ्यायची? असा सवाल केला आहे. येत्या 23 नंतर राज्यात कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर येईल त्यानंतर दामू नाईक यांच्यावर खटले भरू, असा इशारा दिला आहे.