पाण्यासाठी लातूरमध्ये ग्रामस्थांची सरपंचाला मारहाण

    दिनांक :11-May-2019
लातूर: दरवर्षी प्रमाणे यंदाही लातूर जिल्ह्यात दुष्काळ आ वासून उभा आहे. जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईमुळे नागरिकांचे अतोनात हाल होत असतांना स्थानिक प्रशासन मात्र सुस्त असल्याचे दिसून येत आहे. लातूर जिल्ह्यातील हालसी गावात पाणीप्रश्नामुळे सरपंचास ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. संतप्त ग्रामस्थांनी पाण्यासाठी सरपंचाला मारहाण केली आहे. राजू गंगथडे असे या सरपंचाचे नाव आहे.
 
 
 
हालसीत मागील अनेक दिवसांपासून पाणी प्रश्न बिकट बनला आहे. ग्रामस्थांनी एकत्र येत तीस हजार रुपयांची लोकवर्गणी गोळा केली. गावासाठी शासकीय तीन विंधन विहिरी मंजूर झाल्यात मात्र त्या दोनशे फुटापेक्षा जास्त घेता येत नाहीत. यामुळे तीस हजार खर्चून पुढील काम करावे असे ठरले होते. सरपंच राजू गंगथडे यांनी मात्र आचारसंहिताचे कारण देत काम केले नाही. यामुळे काल संतप्त ग्रामस्थांनी सरपंचास चोप दिला. या प्रकरणाची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे.
तर दुसरीकडे दुष्काळ निवारणाच्या कामासाठी आचारसंहिता शिथिल कारण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाला केले होते. निवडणूक आयोगानेसुद्धा त्यांची मागणी मान्य केल्याने आता राज्यात असा प्रकार समोर येणे निंदनीय आहे.