वैमानिकाने बेशुद्ध अवस्थेत चालवले विमान !
   दिनांक :11-May-2019
ऑस्ट्रेलिया,
वैमानिकाच्या चुकीमुळे अनेक अपघात झाले आहे. मात्र एका शिकावू पायलटने बेशुद्ध अवस्थेत तब्बल ४० मिनिटं विमान आकाशात उडवल्याची धक्कादायक घटना ऑस्ट्रेलियात घडली आहे. या घटनेचं हवाई वाहतूकीच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली असून संबंधित विमानचालका विरोधात लवकरच कारवाईही करण्यात येणार आहे.
 
 
ऑस्ट्रेलियातील अॅडिलेड विमानतळाच्या परिसरात ही घटना घडली आहे. संबंधित पायलटची रात्री नीट झोप झाली नव्हती. तसंच सकाळी उठून त्याने पोटभर नाश्ताही केला नव्हता. सकाळी डायमंड डीए ४० हे विमान या चालकाने उडवायला घेतले. विमान आकाशात गेल्यावर पायलटचे डोके दुखायला लागले. त्यानंतर त्याने विमान ऑटोपायलट मोडवर टाकले आणि त्याची शुद्ध हरपली. दरम्यान या विमानाने व्यावसायिक विमानांसाठी आखलेल्या मर्यादेमध्ये प्रवेश केला. यामुळे इतर विमानांच्या वाहतूकीला अडथळा निर्माण झाला.
हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने या पायलटशी संपर्क साधण्याचा भरपूर प्रयत्न केला. साडे पाचहजार फूट उंचीवर गेल्यावर या पायलटची शुद्ध हरपल्यामुळे त्याने कोणतेच उत्तर दिले नाही. ४० मिनिटांनंतर तो पुन्हा शुद्धीवर आला आणि त्याने ऑटो पायलट बंद करून विमान योग्य मार्गावर आणले. विमान वाहतूक नियंत्रण कक्षाला हे कळताच त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.