गर्भवती महिलाही बनू शकतात मानवी बॉम्ब! - आयबीचा इशारा
   दिनांक :11-May-2019
कोलकाता: इसिस आणि अन्य दहशतवादी संघटनांकडून बंगाल आणि बांगलादेशात आत्मघाती हल्ला होऊ शकतो आणि या हल्ल्यासाठी गर्भवती महिलांचा मानवी बॉम्ब म्हणून वापर केला जाऊ शकतो, असा इशारा इंटेलिजन्स ब्युरोने (आयबी) दिला आहे.
आयबीने बंगाल पोलिसांना उपरोक्त इशारा दिला आहे. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी हिंदू आणि बौद्ध मंदिरात हल्ला होण्याची शक्यता आहे. गर्भवती महिलेच्या रूपात मानवी बॉम्बस्फोट घडवू शकतात, असे आयबीने स्पष्ट केले आहे.
जमाल उल्‌ मुजाहिदिन बांगलादेश किंवा इसिसने या हल्ल्याची रणनीती तयार केली आहे. बंगाल किंवा बांगलादेशात हा हल्ला केला जाऊ शकतो, असे आयबीने आपल्या इशार्‍यात म्हटले
आहे.
 
 
यानंतर बंगालचे पोलिस प्रशासन सतर्क झाले असून, राज्यातील सर्व धार्मिक स्थळांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
पोलिसांनी राज्यातील बौद्ध आणि हिंदू मंदिरांची यादी तयार करून, तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यास सुरुवात केली. अशा प्रकारचे हल्ले रोखण्यासाठी आम्ही आवश्यक ती खबरदारी घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी इसिसकडून मिळालेल्या एका टेलिग्राम संदेशात बंगाल आणि बांगलादेशमध्ये दहशतवादी हल्ले घडवण्याचा उल्लेख आहे.