शरद पवारांचे डोळे...
   दिनांक :11-May-2019
 
आता डोळ्यांनीच पाहिले म्हटल्यावर विश्वास ठेवायलाच हवा. अन्‌ त्यातही ते डोळे शरद पवारांचे असतील, तर अगदी डोळे मिटून विश्वास ठेवायला हरकत नाही. शरद पवारांनी प्रत्यक्ष स्वत:च्याच डोळ्यांनी पाहिलं की, इव्हीएममध्ये घड्याळासमोरचं बटन दाबलं आणि मत मात्र कमळाला गेलं. एका निर्जीव मशीनला जे समजतं ते भारतीय मतदारांना केव्हा कळणार देव जाणे! असो. सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, गुजरात व हैदराबाद या ठिकाणची काही इव्हीएम लोकांनी माझ्यासमोर ठेवली आणि बटन दाबण्यास सांगितले. मी घड्याळासमोरचं बटन दाबलं आणि ते कमळाला गेलं. एक समजत नाही की, निवडणूक आयोगाच्या कडेकोट बंदोबस्तात असलेली ही मशिन्स शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना कशी मिळाली? पवार यांना असे सुचवायचे आहे का, की निवडणूक आयोगाच्या कस्टडीत असलेल्या इव्हीएम सुरक्षित नसतात म्हणून! मतदारांमध्ये निवडणूक आयोगाच्या कर्तबगारीबद्दल संभ्रम निर्माण करण्याचाच हा एक प्रयत्न आहे. दुसरे म्हणजे, गुजरात व हैदराबादमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार उभा होता का? असो. एवढे सांगितल्यावर, चलाख शरद पवारांनी याला एक पुस्ती जोडली. सर्वच इव्हीएममध्ये असा बिघाड आहे असे माझे म्हणणे नाही. ही पुस्ती जोडायचे कारण म्हणजे, जर कुठे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार जिंकला तर त्यावर कुणी शंका घ्यायला नको. परंतु, एक आश्चर्य वाटते की, ज्यांच्या नावासमोर ‘कर्मवीर’ अशी पदवी आहे त्या भाऊरावांच्या पुण्यतिथी सोहळ्यात शरद पवारांसारख्या वामपंथी व नास्तिक माणसाने असे ‘अकर्मण्य’ विचार व्यक्त करावे!
 
 
 
 
तसेही शरद पवार फार मार्मिक बोलतात. त्यांच्या बोलण्याचे बरेच अर्थ निघतात. परंतु, जो संदेश द्यायचा तो बरोबर पोचला जातो. यातून शरद पवार कार्यकर्त्यांना कुठला संदेश देत असावेत? त्यांची कन्या आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची स्वप्न बघणार्‍या सुप्रिया सुळे यांच्या विजयाबाबत ते साशंक आहेत की काय! सुप्रिया पराभूत होत असल्याची कुणकुण त्यांना लागली असावी. त्यामुळे 23 मे रोजी मतमोजणी झाल्यावर जर आपली कन्या पराभूत झाली तर, मी आधीच म्हटले होते ना की, इव्हीएममध्ये गडबड आहे म्हणून, असे कारण सांगता यावे. अशी त्यांची रणनीती असावी. ते काहीही असो, निवडणुकीच्या निकालाबाबत इतके हतबल शरद पवार महाराष्ट्राने कधीच बघितले नव्हते. पवारांनी पराभव बघितले नाहीत काय? भरपूर बघितले. अपमानही कमी सोसले नाहीत. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पंतप्रधानपदी आरूढ होण्यासाठी त्यांनी कमी प्रयत्न केले नाहीत. परंतु, कॉंग्रेसने त्यांना होऊ दिले नाही. सोनिया गांधी यांच्या परकीय नागरिकत्वाच्या मुद्यावरून ‘स्वाभिमानी’ घोषणा करणे अन्‌ नंतर त्या वल्गना निमूट गिळून सोनिया गांधींच्या चरणी निष्ठा वाहावी लागणे, इत्यादी अनेक प्रसंग त्यांच्या राजकीय जीवनात आले आहेत. परंतु, प्रत्येक वेळी त्यांच्या वागण्यात, बोलण्यात कुठेही हतबलता नव्हती. त्यांच्या प्रत्येक बोलण्याचे, निर्णयाचे लोकांनी धूर्त चाल म्हणूनच वर्णन केले होते. मग आताच असे काय झाले की, त्यांनी निवडणूक निकालाआधीच पराभवाच्या कारणांची भूमिका बांधणे सुरू केले?
इव्हीएमबाबत विरोधी पक्षांनी हा जो गदारोळ चालविला आहे, तो भारतीय लोकशाहीच्या इतिहासात ‘एक हास्यास्पद प्रयत्न’ या नावानेच ओळखला जाईल. विरोधी पक्षांना असल्या हास्यास्पद कारणांचा आधार घेण्यास कारणीभूत ठरला आहे तो 2014 पासूनचा भाजपाचा विजय! भाजपा इतक्या निर्णायक रीतीने विजयी होऊ शकते, यावर या विरोधी पक्षांचा आजही विश्वास बसत नाही. हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात या राज्यांमध्ये भाजपाला यश मिळाले तर ते समजू शकतो. पण उत्तरप्रदेश? त्रिपुरा? आसाम? इथे भाजपाला यश कसे काय मिळू शकते? महाराष्ट्रात शिवसेनेशी युती न करता, भाजपाला 122 जागा मिळतात अन्‌ भाजपा या राज्यात पाच वर्षे बिनधोक, न अडखळता राज्य करते... या घटना ही मंडळी मान्य करण्यासच तयार नाहीत. या नेत्यांनी त्यांच्या समर्थकांना विचारले असणार की, भाजपाला इतकी मते कशी मिळाली? समर्थकांनी ठोकून दिले असणार की, मशीनमध्येच गडबड आहे. लोकांनी आपल्यालाच मते दिलीत; परंतु मोदी सरकारने या मशीनमध्येच काहीतरी घोळ करून ठेवला. त्यामुळे मत कुणालाही दिले तरी ते शेवटी जाते कमळालाच. ‘सर्व देव नमस्कार: केशवं प्रति गच्छिति।’
मुळात, जे पक्ष एकेका कुटुंबाची जहागीर झाले आहेत, त्या पक्षात संघटन नावाचे काहीही अस्तित्वात नसते. आज कम्युनिस्ट व भाजपा हे दोन पक्ष सोडले, तर बाकी सारे पक्ष एका व्यक्तीभोवती किंवा कुटुंबाभोवती फिरत आहेत. लोकशाहीची ही विटंबनाच नाही का? जवाहरलाल नेहरू यांनी भारतात लोकशाही रुजविली म्हणतात, ती हीच का लोकशाही? नेहरूंच्या कुटुंबीयांनी तर त्यांचा कॉंग्रेस पक्षदेखील असाच एका खुट्याभोवती फिरणारा करून टाकला आहे. कलियुगात संघटनशक्तीलाच महत्त्व असणार आहे. ज्याच्या मागे ही संघटनशक्ती उभी असेल, त्याला यश मिळणारच. हे साधे आणि स्पष्ट तत्त्व, या विरोधी पक्षांना अजूनही समजले नाही, असेच म्हणावे लागेल. गेली काही वर्षे भाजपा, देशातील प्रत्येक प्रांतात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक मंडल स्तरावर आपली संघटनशक्ती वाढविण्याच्या कामात कुठलाही गाजावाजा न करता सातत्याने गुंतली आहे. त्याचे फळ त्या पक्षाला मिळणार नाही तर कुणाला मिळणार? वैयक्तिक संपर्कातून जो बंध तयार होतो, तो मीडियाच्या प्रचाराने िंकवा नेत्यांच्या जाहीर भाषणाने शिथिल होणे शक्य नसते. त्यामुळे वृत्तपत्रांत, टीव्हीवर प्रचाराचा कितीही धुराळा उडविला, तरी जमिनी स्तरावर ज्या पक्षाचे संघटन मजबूत असेल, त्याचीच सरशी होणार. हे काही खूप गुपित आहे असे नाही.
भारतातील सध्याच्या विरोधी पक्षांची आज अशी स्थिती झाली आहे की, सत्ता नसेल तर ते कार्यकर्त्यांना कार्यरत करू शकत नाहीत. सत्तेच्या लालसेने कार्यकर्ते उत्साहात येतात. परंतु, संघटन नसल्यामुळे सत्ता नसेल तर हे पक्ष पंक्चर झालेल्या गाडीसारखे होतात. एकाच कुटुंबात फिरणारे नेतृत्व मान्य करण्यासाठी, कार्यकर्त्यांना काही ना काही लाभाची गाजरे दाखवावी लागतात. तरच त्या कार्यकर्त्यांना (एरवी लायकी नसलेल्या) नेतृत्वाला डोक्यावर घेण्यात रस असतो. अशा प्रकारचे पक्ष भारतीय लोकशाहीला धोका आहेत. हा धोका ओळखून भारतीय नागरिक असल्या पक्षांना कोपर्‍यात भिरकावून देत आहेत. भाजपासारखा संघटनेवर आधारित पक्ष समोर उभा ठाकल्याने मतदारही या पक्षाच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत. अशा भाजपाला टक्कर द्यायची असेल, तर, आपापल्या पक्षाचे संघटन तळागाळापासून नव्याने बांधणे गरजेचे आहे. हे वेळखाऊ व श्रमाचे काम आहे. इथे नेतृत्वाचे संघटनकौशल्य पणाला लागत असते. परंतु, हे सर्व करण्याची तयारी या एकखांबी राजकीय पक्षांमध्ये नाही. जुन्या नेतृत्वात ही शक्ती राहिली नाही आणि तरुण नेतृत्वात ती इच्छाच नाही. म्हणून मग शरद पवारांच्या मुखातून असली मुक्ताफळे बाहेर पडतात. हा असला, वड्याचे तेल वांग्यावर काढण्याचा प्रयत्न म्हणजे हळूहळू विझत चाललेल्या आपल्या राजकीय शक्तीची अप्रत्यक्ष कबुलीच आहे.