आरोग्य सेवेत ठाणे जिल्हा परिषद अव्वल

    दिनांक :11-May-2019
 पुणे: कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, माता व बाल संगोपन कार्यक्रम, लसीकरण यासह अन्य आरोग्य सेवांसाठी राज्य शासनाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ठाणे जिल्हा आरोग्य विभाग प्रथम आला असून, 87 गुण मिळाले आहे. तसेच, दुसर्‍या क्रमांकावर आलेल्या पुणे विभागाने 85 गुणांची प्राप्ती केली आहे.
 

 
 
राज्यातील आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीने सुरू राहावी, रुग्णांना तत्काळ आणि उत्तम सेवा मिळावी यासाठी राज्य शासनाकडून दरवर्षी जिल्ह्यातील आरोग्य विभागाची श्रेणी काढली जाते. यात प्रत्येक विभागाच्या कामाची पद्धत, नोंदणी, साथीचे आजारांवरील नियंत्रण, उपाययोजना आदी बाबींची पाहणी केली जाते. त्यानुसार प्रत्येक सेवेसाठी स्वतंत्र गुण देण्यात येतात. शंभरपैकी अधिकाधिक गुण मिळवणार्‍या आरोग्य विभागाला क्रमांक दिले जातात. यावर्षी प्रथम क्रमांक ठाणे जिल्हा परिषद विभागाला मिळाला असून, केवळ दोन गुणांसाठी पुणे जिल्ह्याचा पहिला क्रमांक सुटला आहे.