पंतप्रधान व केंद्रीय मंत्र्यांचा दौर्‍यांवर ३९३ कोटींचा खर्च

    दिनांक :11-May-2019
 मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील अन्य सदस्यांनी मागील पाच वर्षांच्या काळात देश-विदेशातील प्रवासावर सुमारे 393 कोटी रुपयांचा खर्च केला असल्याचे माहिती अधिकार कायद्यातून समोर आले आहे.
मुंबईतील आरटीआय कार्यकर्ता अनिल गलगली यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे पंतप्रधान आणि अन्य मंत्र्यांनी 2014 पासून देश-विदेशातील दौर्‍यांवर केलेल्या खर्चाबाबतची माहिती मागितली होती.
 

 
 
पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील अन्य सदस्यांनी विदेशातील दौर्‍यांवर पाच वर्षांच्या काळात 263 कोटी रुपयांचा आणि देशातील दौर्‍यावर 48 कोटी रुपयांचा खर्च केला असल्याचे गलगली यांच्या प्रश्नाच्या उत्तरात पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले.
मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या सदस्यांनी विदेशातील दौर्‍यांवर 29 कोटी आणि देशातील दौर्‍यांवर 53 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. अर्थात्‌ पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांनी दौर्‍यांवर केलेल्या खर्चाची एकूण रक्कम 311 कोटी आणि राज्यमंत्र्यांनी केलेल्या खर्चाची रक्कम 82 कोटी रुपये इतकी आहे, असे मंत्रिमंडळ व्यवहाराच्या लेखा विभागातील अधिकारी सतीश गोयल यांनी सांगितले.